पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्याची दैनंदिन दुधाची गरज सुमारे साडेचार लाख लिटर असताना राज्यात केवळ ५० ते ६० हजार लिटरच दूध उत्पादन होत आहे. त्यामुळे दररोज जवळपास चार लाख लिटर दूध बाहेरील राज्यांतून आयात करावे लागत असून, त्यासाठी मोठा महसूल राज्याबाहेर जात आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारने सुधारित कामधेनू योजना लागू केली असून, युवकांनी दुग्धव्यवसायात उतरून गोव्याला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. राज्याला दूध स्वयंपूर्णतेसाठी ७० हजार गायींची गरज आहे.
या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्याला २० गायी खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पहिल्या दहा गायींसाठी ९० टक्के, तर पुढील दहा गायींसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय गायींचा विमा, चारासाठी अनुदान, गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य, मोफत पशुवैद्यकीय सेवा तसेच उत्पादित दुधाची हमीभावाने खरेदी अशा विविध सुविधा सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
राज्यातील दूध संकलन गोवा डेअरीमार्फत केले जाते. विविध दूध उत्पादक संस्थांकडून दूध गोळा करून ते कुर्टी-फोंडा येथील डेअरीत आणले जाते. स्थानिक उत्पादन अपुरे पडत असल्याने महाराष्ट्रातील कोल्हापूरसह इतर भागांतून टँकरद्वारे दूध आयात केले जाते.
पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत सुधारित कामधेनू योजनेतून ३,३५७ गायी शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अनुदान असूनही युवकांचा दुग्धव्यवसायाकडे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. सरकारी नोकरीकडे वाढता कल आणि दुग्धव्यवसायातील श्रम यामुळे अनेक तरुण या क्षेत्राकडे वळत नसल्याचे चित्र आहे
होंडा-सतारी येथील दूध उत्पादक शंकर गावकर म्हणाले, आपण अनेक वर्षे हा व्यवसाय केला; मात्र आता वय झाल्याने तो पुढे सुरू ठेवणे कठीण होत आहे. मुलांना गोठ्यात काम करण्याची इच्छा नसल्याने पुढची पिढी या व्यवसायात येत नसल्याची खंत व्यक्त केली.
अलीकडेच राष्ट्रीय स्तरावरील एका पाहणीत देशातील दुधाच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन लक्षणीय कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या दुधाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राज्यात बाहेरील येणाऱ्या दुधाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी एफडीएने नियमित नमुना तपासणी करणे आवश्यक असल्याची मागणी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
राज्यात बाहेरून मोठ्या प्रमाणावर दूध आयात होत असल्याने त्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. दुधात भेसळ आहे की नाही, याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सातत्याने करावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.
मात्र, तक्रार प्राप्त झाल्यानंतरच तपासणी केली जाते, असे काही दिवसांपूर्वी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मते, बाहेरून येणाऱ्या दुधावर गोवा डेअरीनेही सातत्याने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार तपासणी करणे गरजेचे आहे.
सुधारित कामधेनू योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांना ३,३५७ गायींचे वाटप करण्यात आले आहे. राज्यातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी शासनाकडून विविध अनुदाने आणि सुविधा दिल्या जात आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक यांनी दिली.