

मयुरेश वाटवे
पणजी : वसुबारस ते यमद्वितीया म्हणजेच भाऊबिजेपर्यंत (पाच दिवस) चालणारा दिवाळीचा सण आज शुक्रवारपासून सुरू होत आहे. मराठी मुलखात अभ्यंगस्नान व फराळाने नरकचतुर्दशीला दिवाळी सुरू होत असली तरी गोव्यात मात्र त्याचे वेध आदल्या दिवशीच लागत असतात. का? त्याचे कारण राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नरकासुर वध स्पर्धा.
उत्तर भारतात जशी रामलीलेची परंपरा आहे - त्या दिवशी रावण दहन होते - तशीच गोव्यात नरकासुर दहनाची मोठी परंपरा आहे. युवावर्गाने महिनाभर मेहनत घेतल्यावर नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी नरकासुरांच्या पूर्ण प्रतिमा तयार होतात. नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला काळोख पडायला लागल्यावर संगीताच्या तालावर या मोठमोठ्या नरकासुरांच्या प्रतिमा जागू लागतात. नरकासुर प्रतिमांचे प्रदर्शन गावोगावी, गल्लोगल्ली होत असते. अनेक शहरांत नरकासुर वध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यासाठी या प्रतिमांचे चित्ररथ शहरात फिरतात. अशा स्पर्धांसाठीचे नरकासुर चालते बोलते, फिरते असतात (हलते देखावे). त्यासाठी लाखभरापासून 25 लाख किंवा त्याहून अधिक रकमेची बक्षिसेही दिली जातात.
नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री गावागावांतून आणि एका शहरांतून दुसऱ्या शहरांत विविध प्रकारच्या अकराळविकराळ नरकासुर प्रतिमा पाहाण्यासाठी आबालवृद्धांच्या झुंडी निघतात. प्रत्येक चौकात नरकासुर प्रतिमा असतात. त्याच्या समोर मोठमोठ्याने संगीत लावले जाते, युवक स्वत:ही नृत्य करून एक वेगळा तडका त्याला देत असतात. एक वेगळेच वातावरण या वेळी असते. एरव्ही गोव्यात ट्रॅफिक जॅमचा फारसा प्रश्न नसला तरी या दिवशी मात्र रात्री दहानंतर शहरांत हमखास ट्रॅफिक जॅमचे प्रसंग येतात. संध्याकाळी 8 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. त्यानंतर पहाटे नरकासुराचे दहन केले जाते आणि लोक अभ्यंगस्नान करून फराळ करायला मोकळे होतात.
गोव्यात दिवाळीत फराळ नसतो. ‘पोहे खाण्याची दिवाळी’ असेच त्याला संबोधतात. दडपे पोहे, फोडणीचे पोहे, दूध पोहे, गूळ पोहे असे विविध प्रकारचे पोह्यांचे प्रकार या दिवशी खायला मिळतात. आता बाजाराच्या रेट्यामुळे चॉकलेट, फरसाण, मिठाई असे प्रकारही ताटात येत असले तरी पारंपरिकपणे गोव्यात विविध प्रकारचे पोहेच खाल्ले जातात.
अनेक गावांत प्रत्येकाच्या घरी जाऊन पोहे खाण्याची पद्धत आहे. पूर्वी गावात घरे कमी असल्यामुळे हे शक्य व्हायचे. मात्र नंतरच्या काळात घरे वाढू लागल्यामुळे आज या वाड्यावर, उद्या त्या वाड्यावर अशा प्रकारे ठरवून पोहे खाण्याचा कार्यक्रम केला जाऊ लागला. आज प्रत्येक घरात नोकरदार मंडळी वाढली आहे. मूळ घरात गावी फारसे लोकही नसतात, त्यामुळे ही परंपरा काहीशी लोप पावताना दिसते आहे.
राज्यात मोठमोठ्या नरकासुर प्रतिमा करायचे फॅड हे अलीकडच्या चाळीस वर्षांत आले आहे. त्यापूर्वी वाड्यावाड्यावर एक उभी व एक आडवी बांबू काठी बांधून, त्याला फडकी गुंडाळून विद्रूप दिसणारी नरकासुरस्वरूप प्रतिमा तयार केली जायची. विशेषत: लहान मुलेच संध्याकाळी उशिरा या अशा प्रतिमा गावभर फिरवत आणि उत्तररात्री त्याचेच दहन करून कार्यक्रम आटोपला जाई. नंतरच्या काळात थोडे अजून चांगले नरकासुर करून त्याच्या शरीरात फटाके, दादा बॉम्ब वगैरे लावले जाऊ लागले. त्यामुळे थोडी अधिक मजा वाढली. मात्र अलीकडच्या काळात नरकासुरांचे स्वरूपच पालटून गेले असून नरकासुरांच्या मुखवट्यांची वेगळीच बाजारपेठ तयार झाली आहे. मुले व तरुण वर्ग नरकासुराचे शरीर तयार करतात व नंतर वर हे मुखवटे लावले जातात.