

MLA T Raja Singh Goa
पणजी : गोव्यात हिंदू समाज मोठ्या प्रमाणात जागृत होत असून भविष्यात गोवा धर्मनगरी म्हणून ओळखला जाईल, असा दावा तेलंगणातील आमदार व हिंदुत्ववादी नेते टी राजा सिंह यांनी केला. गोव्यात पोर्तुगीज काळात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत आणि पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या घटनांचे संग्रहालय उभारण्याची तसेच इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
पणजी येथे शनिवारी (दि.२३) हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि गोवा संयोजक सत्यविजय नाईक उपस्थित होते.
रविवारी फोंडा येथील जुन्या बसस्थानकाजवळ आयोजित ‘हिंदू राष्ट्र जागृती सभा’साठी आपण गोव्यात आल्याचे सांगताना राजा सिंह म्हणाले की, हिंदू धर्मरक्षणासोबतच तरुणांना या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी समिती देशभर काम करत आहे. भारत हिंदू राष्ट्र व्हावे, यासाठी जनजागृती सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोव्याचा इतिहास आता लोकांपर्यंत पोहोचत असून धार्मिक दृष्टीकोनातून राज्याकडे पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोर्तुगीज राजवटीत अनेक मंदिरे आणि मठ उद्ध्वस्त करण्यात आले तसेच हिंदूंवर अत्याचार झाले. हा इतिहास पर्यटक आणि तरुण पिढीसमोर यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याशिवाय, गोव्याच्या किनारी भागात बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी अशा लोकांची माहिती गोळा करून त्यांना परत पाठवण्याची मागणी केली. राज्य सरकारने गोवा “रोहिंग्यामुक्त” करण्यासाठी कारवाई करावी तसेच ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले.
गोवा सरकारने मर्दनगड आणि जुने गोवे येथील हातकातरो खांब संरक्षित स्थळ म्हणून अधिसूचित केल्याबद्दल राजा सिंह यांनी मुख्यमंत्री Pramod Sawant आणि राज्य सरकारचे आभार मानले.
दरम्यान, रमेश शिंदे यांनी सांगितले की, या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी समितीची मागणी आहे. फोंडा येथील सभेच्या बॅनरवर काही अज्ञातांनी स्प्रे मारून विद्रुपीकरण केल्याचा आरोप करत याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
उद्याच्या सभेला विरोध करणाऱ्यांनी सहभागी होणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे, मात्र सभा लोकशाही मार्गाने आयोजित करण्यात आली असून गोव्यात लोकशाही मूल्यांचा सन्मान राखला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सभेला मोठ्या संख्येने हिंदू नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.