Goa Politics | आमदार संकल्प आमोणकर यांना मंत्रिपदाचा बोनस; आज घेणार शपथ!

आमदार संकल्प आमोणकर
आमदार संकल्प आमोणकर
Published on: 
Updated on: 

पणजी : मंत्रिमंडळात समावेशाच्या प्रतीक्षेत असलेले मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचा शनिवार, दि. सकाळी १० वाजता दोनापावला येथील लोकभवनमध्ये मंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. राज्य मंत्रिमंडळातील रिक्त असलेल्या एका जागेवर आमोणकर यांची वर्णी लागणार असून, त्यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या आमदार संकल्प आमोणकर यांनी फुटीर काँग्रेसच्या आठ आमदारांच्या गटामधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी तेव्हाच मंत्रिपदाची मागणी केली होती. त्याऐवजी त्यांना बाल भवन अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र त्यांनी ते स्वीकारले नव्हते. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये त्यांनी गोवा सांडपाणी निचरा व साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले होते.

काँग्रेसमधून फुटून भाजपवासी झालेल्या आठ गटांच्या आमदारांपैकी आमदार दिगंबर कामत यांना मंत्रीपद देण्यात आले होते, तर एक पद आमदार रमेश तवडकर यांना दिले गेले होते. त्यामुळे आमदार संकल्प आमोणकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्यावर्षी फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे निधन झाल्यानंतर एक मंत्रिपद रिक्त झाले होते. तेव्हा त्यांनी पुन्हा मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केले होते.

आमोणकर हे मुरगाव मतदारसंघाचे आमदार असून, त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे मुरगाव मतदारसंघाला सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमोणकर यांची मंत्रिमंडळात झालेली नियुक्ती राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. शपथविधीनंतर आमोणकर यांच्याकडे कोणती खाती सोपविली जाणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष तसेच लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.