

पणजी : उत्तर गोव्यातील एका आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणारा आरोपी अटकेत आहे. तरी सुद्धा त्या आमदाराचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गिरीरीज पै वेर्णेकर यांनी तर हा प्रकार ब्लॅकमेलचा की खरोखर काहीतरी सेक्स स्कँडल आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे तो आमदार उत्तर गोव्यातील असला तरी भाजपचा नसल्याचे बोलले जात आहे.
आमदाराने ज्याच्या विरोधात ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळल्याची व त्यानंतर आणखी 5 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप केल्यानंतर सायबर गुन्हे विभागाने ओडिसा येथून संशयिताला अटक केली होती. त्यानंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतानाही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सर्वच क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मॉर्फ्ड व्हिडिओच्या आधारे आरोपी आपल्यास ब्लॅकमेल करत असल्याची आमदाराने तक्रार केली होती.
दरम्यान, संशयित आरोपी कुकेश रावता याने आपला जामीन अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळाली असून त्याने प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज मागे का घेतला असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आमदाराला धमकी देणार्या ओडिशातील कुकेश रावता या 25 वर्षीय व्यक्तीला अटक करून गुन्हा शाखेने त्याचा मोबाईल फोन जप्त केला होता.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कुकेशने 5 डिसेंबर 2023 पूर्वी व्हिडिओ कॉल वरून सदर आमदाराशी संपर्क केला होता. हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून त्याने एका महिलेबरोबर मॉर्फ करून अश्लील व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ सदर आमदाराला पाठवून व्हिडिओ व्हायरल करत बदनामी करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागितली. दरम्यान आमदाराने सुरुवातीला 55 हजार व नंतर 5 लाख रुपये दिले होते.
त्यानंतर आमदाराने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयिताला ओडिसाला जाऊन अटक केली. मात्र तो अटकेत असताना आता दुसरा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.