नवरी नटली; ‘वेबसाईट’ रुसली!

goa-marriage-portal-issue-causes-anxiety-among-wedding-applicants
नवरी नटली; ‘वेबसाईट’ रुसली!Pudhari File Photo
Published on
Updated on
प्रभाकर धुरी

पणजी : सरकारच्या गोवा मॅरेज पोर्टलवर वधू-वरांची माहिती अपलोड होत नसल्याने विवाहोत्सुकांच्या जीवाची घालमेल सुरू झाली आहे. नवरी नटली; ‘वेबसाईट’ रुसली, अशी अवस्था लग्नघरांत पाहायला मिळते आहे.

लग्नसंस्कार म्हणजे दोन घराण्यांना जोडणारा सोहळा. लग्नाची तारीख जसजशी जवळ येते तसतशी लग्नघरात तारांबळ उडते. वधूवरांना हुरहूर लागते. गोव्यात तर लग्नाला कायदेशीर रूप देण्यासाठी आधी वधूवरांना आपापली माहिती ‘गोवा मॅरेज पोर्टल’ या सरकारी वेबसाईटवर अपलोड करावी लागते. मात्र, ही वेबसाइट गेले पंधरा दिवस अगदी ‘स्लो’ आहे. त्यामुळे कुठलीच माहिती त्यावर अपलोड होत नाही. सरकारदरबारी अशी स्थिती असली, तरी लग्नघरात मात्र वेगळीच काळजी आहे. लग्नघटिका जवळ आली, तरीही वधू-वरांची नोंदणी होत नाही. त्यामुळे विवाहोत्सुकांच्या जीवाची घालमेल सुरू झाली आहे.

या पोर्टलवर वधू-वरांना रहिवासी दाखला, जन्म दाखला, आयडी प्रूफ अपलोड करावे लागतात. शिवाय आई-वडिलांच्या माहितीसाठीही हीच कागदपत्रे अपलोड करावी लागतात. विशेष म्हणजे या कागदपत्रांमधील वधू किंवा वराच्या माहितीशी आई वडिलांची माहिती जुळायला हवी. दोघांचा पत्ता, वय, ठिकाण, पिनकोड या गोष्टी जुळल्या तर ठीक, नाहीतर नोंदणी फॉर्म पुढे सरकत नाही. मग दुरुस्ती करून फॉर्म पुन्हा अपलोड करावा लागतो. शिवाय रहिवासी दाखला, जन्मदाखला नवा लागतो. रहिवासी दाखला घेतल्यापासून एक महिन्यात अपलोड करावा लागतो; तो कालावधी उलटला तर पुन्हा नवा दाखला आणावा लागतो. या सगळ्या दुरुस्त्या करण्याची संधी फक्त 5 वेळा दिली जाते. असे असले, तरी गेल्या पंधरा दिवसांपासून अनेकजण विवाह नोंदणीसाठी माहिती अपलोड करत आहेत. मात्र, सरकारी वेबसाईटच स्लो असल्यामुळे लग्न घटिका जवळ येऊन ठेपली तरीही अनेकांची नोंदणीच झालेली नाही. त्यामुळे लग्नाची तारीख सांभाळायची की माहिती भरण्याच्या कामात दिवस घालवायचे असा संतापजनक सवाल अनेक घरांतून विचारला जात आहे.

ऑफलाईन माहिती स्वीकारण्यास नकार

पूर्वी ऑफलाईन माहिती भरली जायची त्यामुळे तिथल्या तिथे दुरुस्त्या करता यायच्या किंवा दुरुस्ती काय करायची हे समजत असे.आता सगळा प्रकार ऑनलाईन झाला. झटपट कामे होण्यासाठी ऑनलाईन रूढ झाले असले ,तरी कधी कधी ऑनलाईनची कूर्मगती मनस्तापाचे कारण ठरते आहे.

उत्तर-दक्षिण गोव्याचे त्रांगडे

उत्तर गोव्यातील फोंडा तालुक्यात असलेली काही गावे पोर्टलवर माहिती भरताना दक्षिण गोव्यात दिसतात, त्यामुळे माहिती चुकू शकते असे वधू- वरांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. सरकारने उत्तर आणि दक्षिण गोव्याचे हे त्रांगडे दूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हो, हे खरे आहे!

यासंदर्भात, संबंधित कार्यालयातील एका अधिकार्‍याशी संपर्क साधला. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी हो, हे खरे आहे. जवळपास दोन आठवडे अशीच परिस्थिती आहे. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी वेबसाईट पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news