Goa Accident | पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे तीन वाहनांची एकमेकांवर धडक; वाहतूक विस्कळीत

म्हापसा-करासवाडा महामार्गावरील घटना; वाहनांचे मोठे नुकसान,
 Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

Mapusa Highway Collision

पणजी : म्हापसा-करासवाडा जंक्शनजवळील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि.४) एका पादचाऱ्याने अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने चार वाहनांचा साखळी अपघात झाला. पादचाऱ्याला वाचविण्यासाठी पुढील वाहनचालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या तीन वाहनांची एकमेकांवर धडक झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, करासवाडा महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना एक पादचारी अचानक रस्ता ओलांडण्यासाठी पुढे आला. त्याला धडक लागू नये म्हणून समोरील वाहनचालकाने क्षणार्धात ब्रेक दाबला. मात्र, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कदंबा बस, कार आणि पिकअप वाहनांच्या चालकांना वाहनांवरील नियंत्रण राखता आले नाही. परिणामी, तीनही वाहने एकमेकांवर आदळून साखळी अपघात घडला.

 Accident News
Goa Opposition Rift Vijay Sardesai | विरोधात पुन्हा विसंवाद! विजय सरदेसाईंना निमंत्रणच नाही, गोवा फॉरवर्ड अध्यक्षांची तीव्र नाराजी

धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक आणि इतर वाहनचालक तातडीने घटनास्थळी धावले. अपघातात कारच्या पुढील व मागील भागाचे मोठे नुकसान झाले असून, धडकेमुळे कारमधील एअरबॅग्सही उघडल्या. तसेच पिकअप वाहन आणि कदंबा बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले.

या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक माहितीनुसार, पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news