Goa Casino Controversy | पणजी लास वेगास, मकावच्या दिशेने?

Goa Casino Controversy | मांडवीतील कॅसिनोंची संख्या वाढता वाढता वाढत आहे. आता आणखी एक नवीन मोठे जहाज मांडवीत येऊ घातल्याने लोकांच्या रागाचा पारा चढला आहे. महापालिका, कॅप्टन ऑफ पोर्टसला निवेदन देऊन झाले आहे. अनेक संघटना आणि राजकीय पक्ष आता कॅसिनोंना विरोध करू लागलेत.
casinos
casinosPudhari File Photo
Published on
Updated on

मयुरेश वाटवे

मांडवी तीरावर एका बाजूला परशुराम यांचा पुतळा आणि दुसऱ्या बाजूला कॅसिनो यांच्यात जणू एक सांस्कृतिक युद्ध सुरू आहे. ज्या कथेनुसार परशुरामांनी समुद्र हटवून ही भूमी निर्माण केली, असे सांगितले जाते, त्याचप्रमाणे आणखी एखादा बाण मारून हे कॅसिनो हटवणे शक्य आहे का, असा प्रश्न लोकांच्या मनात उभा राहतो. कदाचित त्यांचे उर्वरित कार्य आता जनता करणार आहे.

casinos
Accident News | नियतीचा क्रूर खेळ! सोलापूर-धुळे हायवेवर भीषण अपघातात भरधाव नेक्सॉन कारचा चेंदामेंदा; साखरपुडा झालेल्या दांपत्याचा मृत्यू

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी निवडून आल्यानंतर १०० दिवसांत कॅसिनो हटवू, असे म्हटले होते; पण ते काही झाले नाही. अलीकडेच त्यांचे पुत्र आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनीही आपला वैयक्तिक कॅसिनोविरोध व्यक्त केला होता. पणजी महापालिका निवडणुकीत त्यांच्या विरोधात पॅनल देण्याची घोषणा करणाऱ्या उत्पल पर्रीकर यांचाही कॅसिनोंना विरोध आहे. कदाचित ते आपल्या जाहीरनाम्यात हा विषय स्पष्टपणे मांडतील.

सर्वांचाच विरोध आहे; पण कॅसिनो मात्र जागच्या जागीच आहेत हा अलीकडच्या काळातील मोठा “चमत्कार” म्हणावा लागेल. मांडवी नदी वर उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांमुळे गेल्या काही वर्षांत राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांवर जणू काजळी धरलेली आहे. पर्यटनाच्या नावाखाली सुरू झालेला हा उद्योग आता गोव्याचाच घास घेतो की काय, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

“आधीचे होते थोडे आणि व्याह्यांनी धाडले घोडे” या म्हणीप्रमाणे आता एक नवीन, अधिक क्षमतेचा कॅसिनो मांडवीत दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. या कॅसिनोची क्षमता सध्या मांडवीत असलेल्या सर्व कॅसिनोंच्या एकत्रित क्षमतेपेक्षाही अधिक असल्याचे बोलले जाते.

पणजी हे राज्यातीलच नव्हे, तर देशातीलही एक सुंदर शहर होते. कॅसिनोंच्या रूपाने आता त्याला काळा डाग लागलेला आहे. गोवा पूर्वी असा नव्हता. सन, सी अँड सँड म्हणून ओळखला जाणारा, शांत समुद्रकिनाऱ्यांचा, चर्च-मंदिरांच्या सहअस्तित्वाचा, सुसंस्कृत आणि निवांत जीवनशैलीचा हा प्रदेश होता. मासेमारी, शेती, लहान उद्योग, पारंपरिक पर्यटन आणि सांस्कृतिक सणउत्सव यावर आधारलेले समाजजीवन हेच गोव्याचे वैशिष्ट्य होते.

परंतु कॅसिनो उद्योगाच्या आगमनानंतर या राज्याची प्रतिमा, संस्कृती आणि सार्वजनिक जीवनाची दिशाच बदलून गेल्याची खंत लोक बोलून दाखवतात. मांडवी नदीवर तरंगणाऱ्या कॅसिनोंची सुरुवात २००० च्या दशकात झाली. जमिनीवर कॅसिनोला परवानगी न देण्याच्या धोरणामुळे ‘ऑफशोअर कॅसिनो’ ही संकल्पना पुढे आली. मोठी जहाजे नदीत उभी करून त्यावर जुगाराचे केंद्र सुरू झाले.

आज मांडवीत काही प्रमुख कॅसिनो जहाजे कार्यरत आहेत. प्रत्येक जहाजावर शेकडो गेमिंग टेबल्स, स्लॉट मशिन्स आणि हजारो अभ्यागतांना सामावून घेण्याची क्षमता आहे. काही कॅसिनोंची क्षमता एका वेळी १,५०० ते ३,००० लोकांपर्यंत पोहोचते. याशिवाय जमिनीवरही काही कॅसिनो हॉटेल्स आहेत. म्हणजेच मांडवी परिसरात हजारो लोक एकाच वेळी जुगार खेळू शकतील इतकी क्षमता निर्माण झाली आहे आणि नवीन कॅसिनोमुळे ती आणखी वाढत आहे.

कॅसिनो समर्थकांचे म्हणणे असते की या उद्योगातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. वार्षिक शेकडो कोटी रुपयांचे परवाना शुल्क व कर सरकारच्या तिजोरीत जमा होतात. रोजगारनिर्मितीही होते. मात्र महसूल व रोजगार ही दोनच कारणे पुढे करून या उद्योगाचे सामाजिक दुष्परिणाम दुर्लक्षित करता येणार नाहीत.

कॅसिनो येण्यापूर्वीचा गोवा हा निवांत, सुरक्षित आणि कौटुंबिक पर्यटनासाठी प्रसिद्ध होता. आज ‘पार्टी डेस्टिनेशन’ ही ओळख अधिक ठळक झाली आहे. जुगार, मद्यपान आणि रात्रभर चालणारे मनोरंजन हे पर्यटनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचा प्रकारही बदलला आहे.

जुगाराशी संबंधित फसवणूक, आर्थिक वाद, कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक तणाव वाढल्याचे सामाजिक संघटनांचे निरीक्षण आहे. पर्यावरणीय प्रश्न, नदीतील प्रदूषण, वाहतुकीच्या अडचणी आणि दृश्य प्रदूषण यामुळेही स्थानिकांमध्ये चिंता आहे.

casinos
Electrocution death news | अनधिकृत होर्डिंग काढताना शॉक लागून कर्मचारी ठार

राजकीय पातळीवर कॅसिनो खोल समुद्रात हलवण्याची आश्वासने दिली गेली; पण प्रत्यक्षात ती जहाजे वर्षानुवर्षे मांडवीतच उभी आहेत. नवीन कॅसिनो रेईश मागूशमध्ये येणार असल्याच्या चर्चेमुळे तेथील लोकांचाही विरोध वाढतो आहे.

कॅसिनो समर्थक “रोजगार” हा भावनिक मुद्दा पुढे करतात. पण कोणत्याही उद्योगाचे समर्थन केवळ रोजगाराच्या आधारावर करता येत नाही. सामाजिकदृष्ट्या अपायकारक उद्योग असल्यास पर्यायी रोजगारनिर्मितीचा विचार करणे ही सरकारची जबाबदारी ठरते.

लास वेगास किंवा मकाव यांसारख्या ठिकाणी कॅसिनो उद्योगामुळे आर्थिक विकास झाला; पण त्याचबरोबर व्यसनाधीनता, विषमता आणि गुन्हेगारीही वाढली. गोव्याच्या बाबतीतही अशीच एकांगी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते.

निवृत्त न्यायमूर्ती फेर्दीन रिबेलो यांनीही लहान जहाजाच्या जागी अनेक पटीने मोठ्या जहाजाला परवानगी देण्याची कायद्यात तरतूद नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कॅसिनो खोल समुद्रात नेण्याचा निर्णय वारंवार पुढे ढकलला जात आहे. मग नवीन मोठा कॅसिनो आणण्याचाही निर्णय पुढे ढकलला गेला पाहिजे. अन्यथा, आणखी एक मोठा कॅसिनो राज्यात सामाजिक संघर्ष वाढवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news