

मडगाव : काकोडा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पावरून स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, 'चार तालुक्यांचा कचरा म्हणता म्हणता आता नावेली येथील कचरा येथे आणण्याचा घाट घातला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कचरा आम्ही स्वीकारणार नाही,' असा ठाम इशारा कुडचडे परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. दत्तराज राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. वाढत्या प्रदूषणामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांनी अतिरिक्त कचरा आणण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
नागरिकांच्या मते, सुरुवातीला सांगे, केपे, काणकोण आणि धारबंदोडा या चार तालुक्यांपुरताच कचरा प्रक्रिया प्रकल्प मर्यादित ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता नावेली येथील कचरा देखील येथे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदारांनी परस्पर निर्णय घेणे अयोग्य
यावेळी दत्तराज राऊत देसाई यांनी, 'कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवल्यास आमच्यावर पोलीस गुन्हे दाखल केले जातात. मग आम्ही गप्प बसून बघ्याची भूमिका घ्यावी का?' असा सवाल करत 'आम्ही या गावाचे भागधारक असून आम्हाला विश्वासात न घेता आमदार निलेश काब्राल यांनी परस्पर निर्णय घेणे अयोग्य आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.