पेडणे : पेडणे तालुक्यात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत होणारा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हत्ती, गवे आणि बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मोरजी परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा पाळीव जनावरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोरजी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या चार दिवसांमध्ये गव्यांच्या हल्ल्यात दोन गुरे जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे आधीच स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यातच गुरुवारी रात्री मोरजी येथील लोकवस्तीत बिबट्याने प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या एका वासरावर हल्ला केल्याची घटना घडली. मोरजी येथील मरडीवाडा परिसरात सदानंद शेटगावकर यांच्या मालकीचा गोठा असून, या गोठ्यात बिबट्याने शिरकाव केला. गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने अचानक हल्ला केला. वासरू दोरीने बांधलेले असल्याने त्याला बिबट्याच्या तावडीतून सुटणे शक्य झाले नाही. परिणामी, गोठ्यातच बिबट्याने वासराचा फडशा पाडला. यामुळे भीतीचे निर्माण झाले आहे.
मोरजी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी गवे कळपाने फिरताना दिसतात. बिबट्यांचाही संचार लोकवस्तीच्या जवळ वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक, तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
वन खात्याने उपाययोजना करावी
पेडणे तालुक्यातील मोरजीसह इतर भागांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वन खात्याने या घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करून आवश्यक ठिकाणी पिंजरे लावणे, वन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून गस्त वाढवणे आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे गरजेचे आहे.