

पणजी : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पडणार्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून कमी पडलेल्या पावसामुळे निर्माण झालेली तूट भरून कडून 6.7 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी (दि. 16) आणि मंगळवारी (दि.17) मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट ’ देण्यात आला आहे. आठवडाभर पाऊस असाच मुसळधार कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या सकल भागांमध्ये पाणी साचले असून काही ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि दक्षिण गोव्यात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. वार्यांचा वेगही वाढणार आहे. त्यानंतर 21 जून दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात गोव्यात पावसाचा जोर कायम असेल. गेल्या 24 तासात 93.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 361.6 मिलिमीटर अपेक्षित पाऊस होता. तो 385.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे, त्यामुळे काल रविवारपर्यंत 9.1 टक्के तूट भरून 6.7 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली.
गेल्या 24 तासात सांगे येथे 146.7 मिलिमीटर तर धारबांदोडा येथे 1324.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जुने गोवे येथे 114.8 मिमी., पणजी येथे 107.9 मिमी., फोंडा येथे 105.8 मिमी., मडगाव येथे 102.8 मिमी., दाबोळी येथे 100.2 मिमी., केपे येथे 100 मिमी., मडगाव येथे 90 मिमी., साखळी येते 83.8 मिमी., अशा मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.