

पणजी : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर-अनमोड घाट मार्गावर गवेगाळी क्रॉस येथे बुधवारी मध्यरात्री भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले. आंध्र प्रदेश पासिंगची कार (एपी ०२ बीएएन ०२९२) गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने जात होती. त्याचवेळी गोव्यातील केपे येथील कोंबडीवाहू टेम्पो (जीए ०९ यू ६९९०) कर्नाटकातून ब्रॉयलर कोंबड्या घेऊन गोव्याकडे निघाला होता.
गवेगाळी क्रॉस परिसरात कार चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणाऱ्या टेम्पोवर वाहन आदळले. धडक इतकी जबरदस्त होती की आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. या भीषण धडकेत कार मधील दोघांचा (मुरली व महेश, रा. आनंदपूर, आंध्र प्रदेश) जागीच मृत्यू झाला, तर कारमधील याली शेख यांच्यासह टेम्पोतील कलाप्पा मादार व पत्नी दाक्षायनी हे तिघे जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात रात्री साधारण १.३० वा.च्या सुमारास झाला. अधूनमधून पडणारा पाऊस, घाटातील तीव्र वळणे, आणि वाहनांचा बेदरकार वेग यामुळे अनमोड घाट परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.