

पणजी ः गोवा वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर आरोग्य खात्याने डिचोली येथील सामाजिक आरोग्य केंद्रामध्ये ‘पत्रकारांना प्रवेश वर्ज्य’ असा फलक लावला. मात्र, त्यामुळे पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची दखल गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने (गूज) घेतली असून, सदर फलक त्वरित काढावा, न पेक्षा आरोग्य संचालनालयावर पत्रकारांचा मोर्चा घेऊन येऊ, असा इशारा गूजचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी दिला आहे. हा फलक पत्रकारांचा अपमान करणारा असून, नेमके काय साध्य करायचे आहे म्हणून हा फलक लावला गेला. हा फलक लावण्याच्या प्रकाराचा आपण निषेध करत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.
पत्रकारांना जर सरकारी इस्पितळांमध्ये प्रवेश बंद असे फलक लागू लागले, तर मग खासगी संस्थांमध्ये किंवा खासगी कार्यालयांमध्ये कसे फलक लागतील, असा प्रश्न उपस्थित करून एका घटनेवरून पत्रकारांबाबत असा निर्णय घेणे योग्य नसून काही मंत्री, आमदार स्वतःचे कॅमेरेमन घेऊन जातात, गोमेकॉत तसाच प्रकार घडलाय, असे सांगून आरोग्य खात्याने जर असे फलक लावण्याचे आदेश दिले असतील तर त्यांनी ते त्वरित थांबवावे आणि त्यांना जे काय अभिप्रेत आहे त्यानुसार फलक लावावेत. आरोग्य खात्याला अमूक ठिकाणी व्हिडीओग्राफी करणे किंवा फोटो काढणे नको असेल तर तसे फलक लावावेत, मात्र सरसकट पत्रकारांना प्रवेश बंद असे फलक लावणे निषेधात्मक असून सदर फलक त्वरित न हटवल्यास आरोग्य संचालनालयावर मोर्चा नेण्याची वेळ आमच्यावर येईल, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
ग्रामीण पत्रकार संघटनेने डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रामध्ये पत्रकारांना प्रवेश बंद असा जो फलक लावला आहे त्याचा जोरदार निषेध केला आहे, हा प्रकार योग्य नसून सरकारी इस्पितळांत पत्रकारांना प्रवेश का बंद याचे स्पष्टीकरण आरोग्य खात्याने देणे गरजेचे आहे, असेे गोवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष उदय सावंत यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता तो फलक सरसकट पत्रकारांसाठी नाही, तर सामाजिक आरोग्य केंद्रात अंतर्गत भागात व्हिडियोग्राफीस किंवा छायाचित्रे काढण्यास मनाई असा आहे. गोमेकॉतही तसाच फलक लावला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.