

नवी दिल्ली : २०१९ नंतर गोव्यात झालेल्या सरकारी नोकरभरतीमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. या गैरव्यवहाराची श्वेतपत्रिका आणावी आणि यात आलेल्या रकमेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांचेही नाव समोर आले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सावंत यांनीही उत्तर द्यावे. अशी मागणीही काँग्रेसने केली. दरम्यान, हा गैरव्यवहार म्हणजे मध्य प्रदेशातील व्यापम गैरव्यवहाराचा पुढचा अंक असल्याचे म्हणत भाजपवर टीका केली.
राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस नेते गिरीश चोडणकर आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आलोक शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गिरीश चोडणकर म्हणाले की, २०१९ मध्ये गोव्यात कर्मचारी निवड आयोगाची स्थापना करण्यात आली होती, मात्र त्याअंतर्गत भरती करण्यात आली नाही. त्याऐवजी विविध विभागांकडून सर्व भरती करण्यात आली. त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील तरुणांना याची उत्तरे दिली पाहिजेत. या गैरव्यवहारांमुळे एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील तरुणांवर अन्याय झाला आहे. संपूर्ण पाच वर्षांच्या यादीत भरती फक्त राखीव जागाच यादीत आढळून येतात. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील नोकऱ्या विकल्या जाऊ शकतात, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
चोडणकर म्हणाले की, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीने एक ऑडिओ जारी केला होता ज्यामध्ये एक महिला विश्वजीतचे नाव घेत होती. दुसऱ्या एका ऑडिओमध्ये एक आमदार आपल्या कार्यकर्त्याला सांगत आहे की, मी तुमच्या कामासाठी पैसे दिले आहेत, ते पैसे मला परत करा. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल, ते या प्रकरणापासून दूर राहू शकत नाहीत. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यावर आणखी लोकांची नावे समोर येतील, असेही ते म्हणाले. गोव्यातील या प्रकरणात आतापर्यंत २० तक्रारी दाखल करण्यात आल्या असून १९ जणांना अटक करण्यात आली आहे, असे आलोक शर्मा म्हणाले.