

पणजी : गोवा विधानसभेच्या चालू अधिवेशनात हडफडे येथील बर्च नाईट क्लबमधील युरी आलेमाव भीषण दुर्घटनेवर सविस्तर चर्चा करण्यास भाजप सरकार अनुत्सुक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
ही गंभीर आणि मानवी जीवांशी संबंधित घटना असताना सरकार मुद्दाम या विषयावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, बर्च दुर्घटनेत २५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जबाबदारी स्वीकारून या घटनेवर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणणे अपेक्षित होते. सरकारकडून राष्ट्रीय गीत वंदे मातरम् च्या १५०व्या वर्धापनदिनानिमित्त विधानसभेत विशेष चर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.
हा विषय आधीच संसदेत चर्चिला गेला असताना, राज्यासमोर असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा न करता अशा विषयांकडे लक्ष वळवणे ही सरकारची दिशाभूल करणारी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंदे मातरम् हे आम्हा सर्वांसाठी अभिमानाचे प्रतीक आहे. मात्र, सध्या जनतेला बर्च दुर्घटनेतील सत्य, जबाबदारी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार आहेत, याची उत्तरे हवी आहेत, असे ते म्हणाले.