

पुणे : पुढारी वृत्तसेवा
मान्सूनने सोमवारी (दि. १५) आंध्र प्रदेश व्यापला. त्या भागातून महाराष्ट्राला ताकद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात लवकरच मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून अरबी समुद्र अन् बंगालचा उपसागर अशा दोन्ही मान्सून शाखा आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे १८ ते २० जूनदरम्यान संपूर्ण देशात चांगल्या पावसाला सुरुवात होऊ शकते. अरबी समुद्रातील मान्सूनचा वेग फक्त महाराष्ट्रात मंदावला आहे. त्याखाली दक्षिण भारतात मुसळधार पाऊस आहे. याच शाखेतून मान्सूनने सोमवारी (दि. १५) अवघा आंध्र प्रदेश आणि आजूबाजूची राज्ये व्यापली.
त्यामुळे तेथून महाराष्ट्रातील थांबलेल्या मान्सून वाऱ्यांना बळकटी मिळू शकते. तसेच बंगालच्या उपसागरातून वर गेलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या शाखेने ईशान्य भारतासह प. बंगाल आणि बिहार व्यापले. अशा दोन्ही शाखा लवकरच एकत्र होऊन चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील स्थिती
पुढील दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
मान्सूनची सीमा बारामती, सोलापूर, हैदराबाद येथून जात आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील वरच्या हवेत चक्रीय स्थिती
ढगांच्या गडगडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा ४० ते ५० कि.मी. प्रतितास वेगाने येत आहे.