

पणजी : तिळारी धरणाच्या गोव्यात येणाऱ्या पाण्याचा वापर कुठे व किती होतो, तसेच तो वाढवून जलसिंचनाची कार्यक्षमता प्रभावी करण्यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक करण्याचे सरकारने अर्थात जलस्रोत खात्याने ठरविले आहे. नेमणूक करण्यासाठी खात्यातर्फे निविदा जारी करण्यात आली आहे. सल्लागार कंपनीस तिळारीच्या पाण्याचा एकंदरित वापर, पाण्याबाबतची विद्यमान स्थिती याबाबतचा अभ्यास करुन व आढावा घेऊन अहवाल सादर करावा लागणार आहे. शिवाय त्यातून कंपनी सरकारला योग्य त्या शिफारशी देखील सादर करणार आहे.
शेती पिकांना पाणी व उत्तेजन मिळावे, शेतीतील उत्पादन वाढावे, पाण्याचे योग्य ते नियोजन व्हावे व पाणी वाया जाऊ नये, असे अनेक हेतू बाळगून सल्लागार कंपनी नेमण्यात येणार आहे. जलसिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सल्लागार कंपनी महत्त्वाची ठरणार असून ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमानही त्यामुळे सुधारणार आहे. तिळारी पाण्याचा कितपत उपयोग होतो, यावरही कंपनी प्रकाशझोत टाकणार आहे.
योग्य प्रमाणात पाणी मिळण्यासाठी निर्णय
बार्देश तालुक्यातील ३० गावांना, पेडणे तालुक्यातील १६ गावांना आणि डिचोली तालुक्यातील १८ गावांना तिळारीचे पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे. एकूण ११,००० हेक्टर जमीन या पाण्यामुळे ओलिताखाली आली आहे. काही गावांत हे पाणी मिळत नसल्याची किंवा कमी मिळत असल्याची, तसेच ते पाणी अनेकदा अचानक बंद होत असल्याच्या अनेक तक्रारी खात्याकडे आल्यामुळे त्याची दखल घेऊन सरकारने पाण्याचे व्यवस्थापन करण्याच्या हेतूने सल्लागार कंपनी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.