

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आगामी हिवाळी पर्यटन हंगामात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारने आंतरराष्ट्रीय चार्टर फ्लाइट प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. चार्टर ऑपरेटर्सना गोव्यासाठी विमानसेवांचे वेळापत्रक वाढविण्यास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
रशिया, पोलंड, कझाकिस्तान आणि युनायटेड किंगडमसोबत नवीन किंवा विस्तारित हवाई संपर्काची अपेक्षा आहे. 'जगाशी अधिक संबंध, गोव्यासाठी अधिक संधी' या धोरणानुसार पर्यटन खाते परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खंवटे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय संपर्क मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार, विमान कंपन्या, टूर ऑपरेटर आणि पर्यटन उद्योगातील भागधारकांसोबत सरकार काम करत आहे. नोव्हेंबरमध्ये यूके आणि कझाकिस्तानमधून चार्टर सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.