

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा साठा किमान पंधरा दिवस पुरेल इतका आहे. तोपर्यंत गॅस सिलिंडरची समस्या सुटणार आहे. त्यामुळे लोकांनी घाबरू नये किंवा गॅस एजन्सीच्या समोर रांगा लावू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले आहे.
गुरुवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यांमध्ये व्यावसायिक सिलिंडरची समस्या निर्माण झाल्याचे सांगत घरगुती सिलिंडरसाठीची नोंदणी केली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. वेंझी व्हिएगस यांनी सरकारने आता सगळ्यांना इंडक्शन पुरवावेत, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, घरगुती सिलिंडर पंधरा दिवस पुरतील एवढे राज्यामध्ये उपलब्ध आहेत. लोकांनी घाबरु नये. तोपर्यंत सिलिंडरच्या समस्येवर तोडगा निघेल. आपण व्यावसायिक सिलिंडरसाठी केंद्रीयमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यावरही खास धोरण तयार करून पुरवठा होण्याची शक्यता आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.