Goa Football | गोवा फुटबॉलमध्ये मॅच फिक्सिंगचा मोठा स्फोट! 14 खेळाडू निलंबित, पोलिसाचाही समावेश

Goa Football | मॅच फिक्सिंगप्रकरणी जीएफएची कारवाई; क्रीडा वर्तुळात खळबळ
Goa Football
Goa Football
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कथित फुटबॉल मॅच फिक्सिंगच्या आरोपांवरून गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) १४ खेळाडूंवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गोव्यातील फुटबॉल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित खेळाडूंमध्ये एका पोलिस हवालदाराचाही समावेश आहे. पुढील चौकशीसाठी हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवणार असल्याची माहिती जीएफएचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी दिली.

Goa Football
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

या कथित मॅच फिक्सिंग प्रकरणावर मोठी व निर्णायक कारवाई करतानाची पत्रकार परिषदेत माहिती देताना फर्नांडिस म्हणाले की, ही कारवाई प्राथमिक स्वरूपाची असून, त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. निलंबित केलेल्या सर्व खेळाडूंना संघटनेच्या अखत्यारीतील सामन्यांच्या ठिकाणी प्रवेश करण्यासही मनाई केली आहे.

कथित मॅच फिक्सिंग प्रकरणाची पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी जीएफए या प्रकरणाचा २५० पानी चौकशी अहवाल गुन्हे शाखेकडे सादर करणार आहे, असे त्यांनी सांगितले. कथित मॅच फिक्सिंगमध्ये नेमकी कोणाची भूमिका होती, सामने कशा पद्धतीने प्रभावित करण्यात आले आणि यामागे आर्थिक व्यवहार झाले काय, याबाबतची माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

जीएफएच्या अहवालानंतर गुन्हे शाखेकडून या प्रकरणात पुढील चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच अंतिम सत्य बाहेर येईल. अशा प्रकाराविरुद्ध ८-१० वर्षांपूर्वी जीएफएने कारवाई केली असती तर हे प्रकार घडले नसते. या पत्रकार परिषदेवेळी उपाध्यक्ष जनार्दन डिसोझा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जीएफएने घेतलेल्या निलंबनाच्या तडकाफडकी निर्णयामुळे फुटबॉल खेळ संशयाच्या घेऱ्यात आला आहे. मॅच फिक्सिंगसारख्या गंभीर आरोपांमुळे खेळाच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे क्रीडा क्षेत्रातून अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. निलंबित खेळाडूंमध्ये एका पोलिस हवालदाराचाही समावेश असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

क्राईम ब्रँचच्या तपासांनंतर या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गोव्यात फुटबॉल हा लोकप्रिय खेळ असल्याने त्यांच्यामध्येही मॅच फिक्सिंगसारखे प्रकार सुरू झाल्याने अध्यक्ष फर्नांडिस यांनी नाराजी व्यक्त केली. हे प्रकार रोखण्यासाठी अशी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. या कथित प्रकरणात जे दोषी आढळून येईल त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याबरोबरच त्यांना फुटबॉल खेळाच्या क्षेत्रात बंदी घालण्याची कृती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

निलंबित केलेले खेळाडू:

जीएफएकडून निलंबित केलेल्या खेळाडूंच्या यादीत रोहन पेडणेकर, आकाश कुडणेकर, आकाश सनदी, भास्कर जलमी, कृष्णनाथ शिरोडकर, विनायक राणे, चैतन दाभोळकर, सच्चिदानंद साटेलकर, अमन गोवेकर, मिनेश कुंकळकर, सतीश काणकोणकर, मौझान शेख (पोलिस), सूरज हडकोणकर, रोनाल्डो ऑलिव्हेरा यांचा समावेश आहे.

Goa Football
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

नेहरू स्टेडियम फक्त फुटबॉल खेळापुरतेच ठेवा : फर्नांडिस:

फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे फक्त फुटबॉल खेळापुरतेच ठेवण्यात यावे. गोव्यातील हे एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम आहे. या स्टेडियमवर क्रिकेट सामने वारंवार खेळवले गेल्यास त्याचा दर्जा कमी होईल. गोवा क्रिकेट असोसिएशनकडे (जीसीए) स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, तसेच क्षमता असल्याचे मत जीएफएचे अध्यक्ष फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news