

पणजी : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील गिरी - पर्वरी दरम्यान नव्याने बनत असलेल्या उड्डाणपुलाचा स्लॅब आज कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या संपूर्ण प्रकरणाची कंपनीतर्फे चौकशी सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचा भाग असलेला पर्वरी ते गिरी दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या संपूर्ण पुलाच्या फाउंडेशनचे काम पूर्ण झाले असून, कंट्रक्शन आणि सुपर कंट्रक्शनच्या कामाला सुरुवात झाली आहे या दरम्यान गिरी सर्कल जवळचे स्लॅब जोडणीचे काम सुरू असताना हा स्लॅब कोसळला यामुळे एकूणच या उड्डाणपुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याने आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या उड्डाणपुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यासाठी अत्यधिक कमिशन दर आकारण्यात आले आहेत,असा आरोप करत पालेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना एवढ्या हलगर्जीपणाने काम करण्यात आले आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे, तत्काळ तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पालेकर यांनी केली आहे.