

पणजी : गोव्यातील चित्रपट निर्मिती आणि कलाक्षेत्राला प्रोत्साहन देणारी राज्यातील पहिली ‘फिल्म सिटी’ आता काणकोण तालुक्यातील भगवती पठारावर उभारण्यात येणार आहे. यासाठी लोलये-पाळोळे कोमुनिदाद आणि गोवा मनोरजन सोसायटी (जीईएस) यांच्यात 99 वर्षांचा भाडे करार नुकताच करण्यात आला.
हा करार राज्यातील कला, पर्यटन आणि रोजगाराच्या द़ृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. चित्रपट सृष्टीशी संबंधित आधुनिक सुविधा, स्टुडिओ, ओपन शूटिंग लोकेशन्स, पोस्ट-प्रॉडक्शन युनिट्स यांचा समावेश असलेली ही फिल्म सिटी भविष्यात गोव्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या उंचीवर नेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
केवळ फिल्म सिटीच नव्हे, तर लोलये-पाळोळे कोमुनिदादने अनेक महत्त्वाचे प्रकल्पही मान्यता दिले आहे. यात सैनिक स्कूल, क्रिकेट स्टेडियम, सौरऊर्जा प्रकल्प, फूड प्रोसेसिंग युनिट आणि महामार्ग लगतच्या सेवा सुविधांचा समावेश आहे.