

पणजी : रुग्णांशी अरेरावी भाषेत बोलणार्या गोमेकॉतील एका डॉक्टरला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सर्वांसमक्ष चांगलेच फैलावर घेतले. सर्वसामान्यांची सेवा करत नसाल तर तुम्हाला सरकारी सेवेत राहण्याचा अधिकार नाही, असे सांगत सदर डॉक्टरला त्वरित निलंबित करण्याचे आदेश अधीक्षक राजेश पाटील यांना दिले.
बांबोळी येथील गोमेकॉत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवार, 7 जून रोजी आकस्मिक भेट देत कामकाजाची पाहणी केली. सदर डॉक्टर गोमेकॉत उपचारांसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाशी उर्मट पद्धतीने वागल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे आली होती. विविध वार्डांत पाहणी केल्यानंतर त्यांनी डॉ. रुद्रेश यांना पाचारण करत त्यांना त्यांच्या वर्तवणुकीबाबत जाब विचारला. यावेळी कोणतेही समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने आरोग्यमंत्र्यांनी सदर डॉक्टरला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. यावेळी डॉ. रुद्रेश यांनी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला असता, तुम्ही तुमचे स्पष्टीकरण चौकशीवेळी किंवा न्यायालयात द्या. मी आरोग्यमंत्री असेपर्यंत तुमचे निलंबन कायम राहणार असल्याचेही मंत्री राणे म्हणाले.
गोमेकॉतील डॉक्टर्स सर्व रुग्णांची योग्य पद्धतीने देखभाल करतात. मात्र काहींच्या चुकीच्या वागण्यामुळे सर्वांना नाहक त्रास सोसावा लागतो. हे लोक सामान्यांची सेवाही करू शकत नसतील तर अशांना सरकारी सेवेत ठेवण्याचे काहीच कारण राहत नाही. मंत्री म्हणून मला हे पाऊल उचलावे लागले, असे पत्रकारांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले.
राज्यातील आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आरोग्यमंत्री राणे प्रयत्न करीत आहेत. फेब्रुवारी महिन्यात म्हापसा उपजिल्हा रुग्णालयातील दोन चालक व अन्य एका कर्मचार्याला निलंबित केले होते. एप्रिलमध्ये देखील कामकाजाची पाहणी करताना उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट डॉ. शर्ली रिबेरो यांना कामावरील निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आले होते. यानंतर मे महिन्यात राणे यांनी 2 आरोग्य निरीक्षक आणि 4 स्वच्छता निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली होती.