

पणजी : राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली.
कोटीतीर्थ कॉरिडोअर विकास प्रकल्पांतर्गत श्री सप्तकोटेश्वर कोटीतीर्थ जीर्णोद्धार समितीच्यावतीने दिवाडी येथे गुरुवारी (दि. ४) उदकशांती आणि गंगापूजन आणि अन्य धार्मिक विधींचे आयोजन केले आहे.
या सोहळ्याचे यजमान मुख्यमंत्री सावंत आहेत. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी म्हणाले की, दिवाडी येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या पवित्र ठिकाणी जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना १४ व्या ते १६ व्या शतकातील अवशेष सापडणे ही गोव्याच्या पुरातत्व आणि सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना आहे.
सापडलेल्या वास्तुशिल्पीय अवशेषांमध्ये दरवाजाच्या चौकटीवर कोरले जाणारे कीर्ति मुख, मंदिराच्या भिंतीवरील कोनाड्याचा भाग असलेले देव कोष्ठमचा भाग आणि कोटी तीर्थ आणि माधव तळी यांना जोडणारा एक प्राचीन परिक्रमा पथ यांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.