

सांगे : पुढारी वृत्तसेवा
तळसाय गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गढूळ पाण्याच्या वादाला धक्कादायक वळण मिळाले. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत स्वच्छ बोअरवेलचे पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली असताना, अज्ञात व्यक्तींनी जवळील जुन्या विहिरीतील दूषित व कुजलेले पाणी त्याच टाकीत वळवण्यासाठी बेकायदेशीर जलवाहिनी जोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणाची दखल घेत उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरची जलवाहिनी काढून टाकण्याचे आदेश दिले. तळसाय गावात काही दिवसांपासून गढूळ आणि दूषित पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. गावासाठी बोअरवेलची व्यवस्था उपलब्ध असतानाही नागरिकांना अस्वच्छ पाणी मिळत असल्याने प्रश्न अधिकच गंभीर बनला होता या मध्यावरून राजकीय वातावरणही तापले होते.
समाजकल्याण मंत्री सुभाष फलदेसाई यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप, पेयजल खात्याचे अधीक्षक अभियंता देविदास बोरकर, आरोग्य खात्याचे वासुदेव नाईक, दिनेश भंडारी, सरपंच चंदन उनंदकर आदींनी पाहणी केली. तपासणीत ही संपूर्ण जलवाहिनी कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा गंभीर प्रकार असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
उपजिल्हाधिकारी वेळीप यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना निर्देश देत बेकायदेशीर जलवाहिनी बंद करून ती पूर्णपणे काढून टाकण्याची कारवाई केली. वेळीप म्हणाले, ग्रामस्थांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घेतली जात असून, याप्रकरणी आवश्यक ती चौकशीही करण्यात येईल.
सखोल चौकशी करणार...
दरम्यान, या प्रकारामुळे तळसायमधील गढूळ पाण्याच्या समस्येमागील कारण स्पष्ट झाल्याची चर्चा सुरू असून, बेकायदेशीररीत्या जलवाहिनी कोणी टाकली आणि त्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.