

पणजी : पुढारी वृत्तसेवा
वर्षभरात गोव्यात नव्याने शंभर बंधारे उभारण्याची सरकारची योजना असल्याची माहिती जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर यांनी दिली. सालेलकर म्हणाले की, सध्या पावसाने जरी विश्रांती घेतली असली, तरी सर्व धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. गेले पाच दिवस राज्यातून पाऊस गायब झाला आहे.
जूनमध्ये सुरुवातीपासून तीन आठवडे पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणी कसे मिळणार, असे वाटत होते. प्रत्यक्षात जूनच्या अखेरच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणात दैनंदिन येणारी पाण्याची आवक एकदमच कमी झाली आहे.
मात्र, अद्याप चिंता निर्माण झालेली नाही. कारण अजूनही पावसाचे दोन महिने आहेत. गोव्यात पाऊस अजूनही पडायचा आहे आणि त्यामुळेच धरणांमध्येदेखील पाणीसाठा वाढत जाईल. तथापि नागरिकांनी पाण्याचा वापर पाहिजे तेवढाच करणे योग्य ठरेल, असे सांगून सालेलकर म्हणाले की, पुढील वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.
गोव्यात नव्याने शंभर बंधारे उभारण्याची जलस्रोत खात्याची योजना आहे. जलसोत्रमंत्री (जलस्रोतमंत्री) सुभाष शिरोडकर यांनी तशी योजना आखलेली आहे. आतापर्यंत दहा ते बारा बंधारे मंजूर झालेले आहेत. पावसाळ्यानंतर त्यांचे काम सुरू होईल.
या व्यतिरिक्त धरणांमध्ये साचलेला गाळदेखील उपसण्याचे काम हाती घेतले जाईल. पाण्याची पातळी उन्हाळ्यात कमी होईल आणि गाळ उपसण्याचे काम सुरू होईल. यासाठी धरण प्राधिकरणाकडून परवानगी आवश्यक असते.
एक-दोन धरणांसाठी मिळालेली असून इतर धरणांसाठी तशी परवानगी मिळाल्यानंतर सुरक्षेचे सर्व उपाय हाती घेऊन नंतरच धरणातील गाळ काढला जाईल.
धरणातील गाळ काढल्यानंतर जास्त प्रमाणात तिथे पाणी राहील. मात्र, गाळ काढताना त्याचा धरणावर परिणाम होऊ नये यासाठी फार काळजी घ्यावी लागणार आहे.