Goa Dabolim Airport news | दाबोळी विमानतळ सुरूच राहणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; विरोधकांची केवळ राजकीय स्टंटबाजी
Daboli Airport
Dabolim Airport
Published on
Updated on

पणजी : निवडणुका जवळ आल्या की विरोधक दाबोळी बंद होणार म्हणून लोकांची दिशाभूल करतात. अनेक वर्षे हेच चालू आहे. मात्र, दाबोळी विमानतळ बंद होणार नाही. या विमानतळाच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे; तो दाबोळी विमानतळ बंद करण्यासाठी नाही. दाबोळी बंद होणार हा विरोधकांचा राजकीय स्टंट आहे हे लोकांना माहीत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिली.

Summary

ठळक मुद्दे:

  • विमानतळ विस्तारासाठी झालेत ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च

  • जवळच्या उड्डाण पुलासाठी ४५४ कोटी खर्च

  • विरोधक लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप

दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी संसदेबाहेर एक व्हिडिओ काढून, त्यात आपणास गोपनीय माहिती मिळाली आहे की दाबोळी बंद पडणार आहे, असे विधान केले होते. त्यानंतर गोव्यातील विरोधकांनी त्यांच्या सुरात सूर मिळवला. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. सावंत यांनी वरील प्रतिक्रिया दिली. खासदार फर्नांडिस हे दररोज संसदेच्या बाहेर व्हिडिओ काढून खोटी माहिती लोकांना देतात. आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी विरोधक लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

संरक्षण मंत्र्यांकडून ठोस आश्वासन : मुख्यमंत्री

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अनेकवेळा दाबोळी सर्व विमानांसाठी खुला राहील, असे ठोस आश्वासन दिले आहे. मोपा विमानतळ बांधण्यापूर्वी मंत्रिमंडळाने दाबोळी बंद करणार नसल्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे व तो विमानतळ नौदल आणि नागरी दोन्ही वापरासाठी काम करेल, असे सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांनी दाबोळीचे राजकारण करून निवडणुका जिंकण्याची स्वप्ने पाहू नयेत व लोकांची दिशाभूल करू नये, असे डॉ. सावंत म्हणाले. खासदार फर्नांडिस यांनी संसदेचे व खासदारकीचे महत्त्व जाणून बोलत जावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

अफवा पसरवणे बंद करा : आमोणकर

विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. विरोधकांना सरकारच्या विरोधात काहीच विषय मिळत नसल्याने दाबोळी बंद होणार अशी अफवा पसरवून विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली. अनेक पर्यटक टॅक्सी चालकांसोबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. खासदार फर्नांडिस यांना माहीत आहे की, सरकार मजबूत आहे. केंद्र व राज्य सरकारने अनेकवेळा दोन्ही विमानतळ चालू राहणार असे घोषित केले आहे. तरी लोकांची दिशाभूल करण्यासाठी दाबोळी बंद होणार, अशी अफवा खासदारांनी उठवली. लोक त्यांच्या अफवेला बळी पडणार नाहीत, असे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले.

गोपनीय माहिती जाहीर करा : काब्राल

दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी आपणास गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांना जी गोपनीय माहिती मिळाली आहे, ती त्यांनी जाहीर करावी किंवा मुख्यमंत्र्यांकडे द्यावी. उगाचच राजकीय फायद्यासाठी दाबोळीचा वापर करू नये, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश काब्राल यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या खासदारांनी राजकीय लाभासाठी लोकांची दिशाभूल करू नये, खात्रीशीर माहिती जाहीर करावी. अनेक वर्षांपासून विरोधक दाबोळी बंद होणार असे सांगत लोकांची दिशाभूल करत आहेत. खुद्द संरक्षण मंत्र्यांनी हल्लीच दाबोळी सुरूच राहणार असे जाहीर केलेले आहे, असे काब्राल म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news