Curdi Village Goa : गोव्यात वर्षातून एकदा दिसणारे कुर्डी गाव

पर्यटकांना भुरळ : प्रकल्पग्रस्तांच्या आठवणींना मिळतो उजाळा
Curdi Village Goa
गोव्यात वर्षातून एकदा दिसणारे कुर्डी गाव
Published on
Updated on

प्रभाकर धुरी

पणजी : वर्षातून एकदाच उन्हाळ्यात दिसणारे गोव्यातील गाव कोणते असेल, तर ते कुर्डी. हे कृषीसंपन्न गाव साळावली धरणामुळे उठले. प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर झाले. घरे, दारे सगळे मागे सोडून केवळ आठवणींची शिदोरी सोबत घेऊन प्रकल्पग्रस्त गावापासून दूर गेले. मात्र, धरणातील पाण्याची पातळी खालावते आणि कधी काळी तिथे असलेल्या गावाच्या खुणा दिसू लागतात, तेव्हा प्रकल्पग्रस्तांच्या आठवणींना उजाळा मिळतो. हे गाव मग त्यांच्यासाठी बनते श्रद्धा, भावना आणि इतिहासाचा संगम.

कुर्डी हे गाव कुशावती नदीच्या काठावर वसलेले होते. नदी किनाऱ्यापासून फार दूर नसलेल्या एका टेकडीवर सोमेश्वर मंदिर उभे होते. ते आजही आपल्या सभोवतालच्या गावाची आठवण म्हणून दिमाखाने उभे आहे. महान शास्त्रीय गायिका ‌‘पद्मविभूषण‌’ मोगुबाई कुर्डीकर यांचे कुर्डी हे जन्मस्थान. किशोरी आमोणकर या त्यांच्या कन्या. मोगुबाईंनी त्यांचे बालपण येथे घालवले असले, तरी त्यांनी आपली कारकीर्द प्रामुख्याने मुंबईतच घडवली.

ऐन उन्हाळ्यात जेव्हा हे पाण्याखाली गेलेले गाव दिसू लागते, तेव्हा त्यांचे पाण्याखाली गेलेले घर हेच पर्यटकांसाठी सर्वात मोठे आकर्षण ठरते. पर्यटक ते शोधण्याचा प्रयत्न करतात. कुर्डीत दिसताच भग्नावस्थेतील जुन्या घरांचे अवशेष, घरासमोरील तुळशी वृंदावन, तग धरून असलेले सोमेश्वराचे मंदिर, कुर्डीतील लोकांच्या जुन्या विहिरी व अनेक अर्धवट वास्तू. गेल्या 40 वर्षांच्या काळात बरेच अवशेष लोप पावले होते. साळावली धरणापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर कुर्डी गाव आहे. कुर्डीचे ग्रामस्थ आजही सोमेश्वर मंदिराची डागडुजी करून दरवर्षी ‌‘कुर्डी‌’ महोत्सव साजरा करतात.

गावाला भेट देण्यासाठी योग्य वेळ कोणती?

गावाला भेट देण्यासाठी एप्रिल, मे महिना हा सर्वोत्तम काळ आहे. मान्सूनचा अंदाज पाहून, गोव्यात मान्सूनपूर्व सरी सुरू होण्यापूर्वी जाऊ शकता.

कुर्डीला कसे जाता येते?

रेल्वे किंवा बसने मडगावला यायचे. तेथून 32 किमी आणि पणजीपासून 66 किमीवर कुर्डी गाव आहे. टॅक्सी, कार किंवा दुचाकीनेही जाता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news