

पणजी : क्राईम ब्रँच कार्यालयात अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक विकास देयकर आणि महिला पोलिस कर्मचारी रजनी पालयेकर या दोघांना जुने गोवे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील संशयिताला लवकरच अटक केली जाईल, असे विधान केल्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली. दोघांना पोलिस कोठडीसाठी गुरुवार, दि. ५ रोजी मेरशी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संशयितांच्या जबाबांमध्ये महत्त्वपूर्ण विसंगती आढळून आल्या. तसेच, प्रकरणातील काही महत्त्वाच्या बाबींवर दोन्ही संशयित समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. तपासादरम्यान जमा झालेले पुरावे, गुन्ह्यातील कथित सहभाग, तपासात अपेक्षित सहकार्य न करणे, कोठडीतील चौकशीची आवश्यकता तसेच साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची आणि पुराव्यांमध्ये फेरफार करण्याची शक्यता लक्षात घेऊन ही अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
जुने गोवे पोलिसांनी ३१ ऑक्टोबर रोजी पोलिस निरीक्षक विकास देयकर आणि महिला पोलिस कर्मचारी रजिनी पालयेकर या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर देयकर याला निलंबित करण्यात आले होते. महिला पोलीस कर्मचाऱ्याविरुद्धही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.