

मडगाव : समाजमाध्यमांचा गैरवापर करत एका अल्पवयीन मुलीवर सलग पाच वर्षे लैंगिक अत्याचार व मानसिक छळ करण्यात आल्याचा प्रकार मायणा कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत उघडकीस आला आहे. पीडितेच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी २३ वर्षीय संशयिताच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा दीर्घकाळापासून पीडित मुलीला मानसिक दबावाखाली ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. या अत्याचारानंतरही तो पीडितेशी संपर्क तोडण्यास तयार नसून 'इन्स्टाग्राम' सारख्या समाजमाध्यमांद्वारे तिला सतत त्रास देत होता. पीडितेच्या एका मित्राच्या नावाची बनावट ओळख वापरून तो समाजमाध्यमांवरून तिच्याशी संपर्क साधत होता.
संशयिताने पीडितेकडे आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओंची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्यास अश्लील साहित्य संकेत स्थळांवर व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला सातत्याने ब्लॅकमेल करत होता. या सततच्या भीती, दबाव आणि मानसिक छळामुळे पीडिता त्रस्त झाली होती. अखेर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.