

पणजी : मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांवर किड्स झोन आणि प्ले-झोनच्या नावाखाली २१ वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जात असून, हे गोवा बाल हक्क कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगत पणजीकर अगेन्स्ट कॅसिनो (पीएसी) संघटनेने शनिवारी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
वाल्मिकी नाईक, सबिना मार्टिन्स आणि क्रिसेल डायस यांनी या संदर्भात त्या सहाही कॅसिनोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जुगार कायद्यांतर्गत २१ वर्षांखालील व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घालणाऱ्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत पणजीकर अगेन्स्ट कॅसिनो संघटनेने कॅसिनोच्या कामकाजावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
त्यांनी दावा केला आहे की, मुलांना ऑफशोअर कॅसिनो जहाजांवर नेले जात असून, हे बाल कायद्याचे उल्लंघन आहे. त्यांनी सहा कॅसिनोविरोधात तक्रार दाखल केली असून, अल्पवयीन मुलांसाठी कॅसिनो भेटी सामान्य वाटाव्यात यासाठी प्रमोशनल पॅकेजेस आणि ऑनलाईन सामग्रीचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे, त्यात यूट्यूबवर प्रसारित होणाऱ्या व्हिडीओंचाही समावेश आहे.