

मडगाव : मृत्यूच्या दारापर्यंत साथ न सोडण्याची शपथ घेतलेल्या रमाकांत-रमिला या वृद्ध दांपत्याची पार्थिवे तीन दिवस शवागरात पडून राहिली, आणि जिवंतपणी नात्यांची शपथ देणाऱ्या कुटुंबीयांनी त्यांच्यापासून हातही झटकला. या असह्य शांततेला चिरत ‘दैनिक पुढारी’ने आवाज उठवला, आणि त्या आवाजाला प्रतिसाद देत कुलदेव बेताळ वस्त कुटुंबीय संघटनेने मानवी कर्तव्याची लगबग दाखवली. अखेर समाजाच्या जागृतीमुळे या दांपत्याला सन्मानाने मुक्ती मिळाली. सोमवारी मडगावच्या हिंदू मठ ग्रामस्थ सभेच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोघांचेही आयुष्य साधे, शांत आणि जगापासून जवळपास अलिप्तच होते. पण एकमेकांच्या सोबतीत त्यांना संपूर्ण जग सापडले होते. रमिलाच्या अचानक आजारपणाने त्यांच्या संसारावर काळी छाया पसरली आणि तिचा श्वास थांबताच रमाकांतही काही तासांत कोसळले. तिच्याविना जगणे त्यांना सहनच झाले नाही; आणि तिच्यातच त्यांचा श्वास अडकला होता, म्हणूनच दोघांचेही अंत जवळजवळ एकत्रच झाले. मात्र मृत्यूनेही जे नाते वेगळे करू शकले नाही, त्याला जगाने दूर केले. त्यांच्या शरीरांवर तीन दिवसांचे मौन होते ते त्यांचा मृत्यू नसून समाजाच्या जिवंत संवेदनांचा मृत्यू होता. शवागारात दोन पार्थिवे एकमेकांच्या शेजारी पडून होती, आणि जिवंतपणी ज्यांनी त्यांना आधार दिला नाही त्यांनी मृत्यूनंतरही त्यांच्याकडे वळून पाहिले नाही. ही उदास, वेदनादायक शांतता ‘दैनिक पुढारी’ने भेदली. बातमी प्रसिद्ध होताच, अस्वस्थता पसरली आणि मानवी संवेदना जाग्या झाल्या. कुलदेव बेताळ वस्त कुटुंबीय संघटनेने तत्परतेने पुढाकार घेतला, पार्थिवे स्वीकारली, सर्व धार्मिक विधी पार पाडले आणि दांपत्याला त्यांच्या आयुष्यात कधी न मिळालेला सन्मानित निरोप दिला. या धावपळीच्या जीवनात एकमेकांशी संवाद साधणे दुर्लभ बनले आहे. कधी विवाहबाह्य संबंध तर कधी एकमेकांमधील अहंकार आणि गैरसमजुतीतून निर्माण होणाऱ्या वादामुळे धरलेला अबोला, भातुकलीचे कित्येक डाव अर्ध्यावर मोडण्यास कारणीभूत ठरत आहेत. किरकोळ वादांना घटस्फोटापर्यंत नेणाऱ्या जोडीदारांसमोर कुडचडे येथील रमाकांत आणि रमिला या वृद्ध दांपत्याने शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ न सोडता नात्याचा खरा अर्थ आपल्या जगण्याने सिद्ध करून दाखवला.
मडगावच्या हिंदू मठ ग्रामस्थ सभेच्या स्मशानभूमीत सोमवारी या दांपत्याला श्रद्धेने अंतिम निरोप देण्यात आला. जिवंतपणी मिळाली नसेल तशी साथ त्यांना मृत्यूनंतर समाजाने दिली. दोघांचा शेवटचा प्रवासही एकत्रच झालाजगाचा अनादर मागे पडला आणि अखेर त्यांना सन्मानाची मुक्ती लाभली.