Goa Congress Alliance | काँग्रेसमध्ये युतीबाबत अद्यापही संभ्रम कायम

Goa Congress Alliance | सहकारी पक्षांकडून युतीसाठी दबाव : प्रदेशाध्यक्ष बदलाचा परिणाम होण्याची शक्यता
goa congress
goa congress
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात सध्याच्या स्थितीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात येत्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडे स्वतःच्या २८ आमदारांसह २ मगो व ३ अपक्षांसह एकूण ३३ आमदारांचे संख्याबळ आहे, तर काँग्रेसकडे ३, आम आदमी पक्षाकडे २, गोवा फॉरवर्ड व रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे प्रत्येकी १ अशा ७ आमदारांचे पाठबळ आहे.

goa congress
Mahayuti Legislative Council Victory | महायुतीचा दबदबा

सत्ता प्राप्तीसाठी भाजपने आपले २८ पैकी २१ आमदार निवडून आणले तरी त्यांना सत्ता मिळेल, तर काँग्रेसला ३ वरून २१ वर पोचावे लागेल. सहकारी पक्षांसोबत सत्ता स्थापन करायची असली तरी काँग्रेस आघाडीला ७ चे २१ करावे लागणार आहेत. सध्याचे वातावरण पाहिल्यास काँग्रेस सहकारी पक्षांसोबत युती करावी की नाही, या संभ्रमात दिसते. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई हे काँग्रेसना युती करण्यासाठी वारंवार डेडलाईन देत आहेत.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पूर्वी काँग्रेस सोबत कुठेच युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, राज्यातील आपल्या दोन आमदारांच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांना आपली घोषणा मागे घेत राज्यात काँग्रेससोबत युती करण्यास मान्यता द्यावी लागली आहे. मात्र, आपले उमेदवार असलेल्या बाणावली व वेळ्ळी या मतदारसंघातील जिल्हा पंचायतीच्या जागा काँग्रेसने जिंकलेल्या असल्याने काँग्रेस आप सोबत युती करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.

विजय सरदेसाई हे तर काँग्रेसने लवकरात लवकर युतीबाबत घोषणा करावी, अशी मागणी सातत्याने करत आहेत. काँग्रेस युतीबाबत कोणतीही भूमिका घेत नसल्याचे त्यांनी दहा मतदारसंघात गट समित्या स्थापून पक्षाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत. आरजी पक्ष पूर्वी काँग्रेस सोबत युती व्हावी म्हणत होता. मात्र, सध्याची काँग्रेसची स्थिति नाजूक झालेली असतानाच प्रदेशाध्यक्ष बदलाचा धक्का पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बसला आहे

गेली साडेचार वर्षे प्रदेशाध्यक्ष म्हणून अमित पाटकर यांनी काँग्रेसला चांगली उभारी दिली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पाटकर यांच्या जागी गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यामुळे काँग्रेसमध्ये जास्तच गोंधळ निर्माण झाला.

अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. पाटकर पक्षात राहतील की नाही हे सांगता येत नाही. चोडणकर यांच्या काळातच काँग्रेसचे आमदार दोन वेळा फुटल्याने अल्पसंख्याक ख्रिस्ती समाज काँग्रेसवर नाराज झाला होता. त्यातच चोडणकर यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष केल्याने अल्पसंख्याक समाजाचे नेते गिरीश व काँग्रेसच्या विरोधात बोलत असल्याने काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा ठरू शकतो.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल हे गोव्यात येऊन गेले. दोन दिवस ते गोव्यात राहिले. या काळात युतीबाबत त्यांनी सहकारी पक्षांसोबत चर्चा केली नाही की पक्षातील नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले नाही.

युतीसाठी किती जागा?

काँग्रेसने गोवा फॉरवर्ड, आप, आरजी व राष्ट्रवादी या सहकारी पक्षांसोबत युती केल्यास सहकारी पक्षांना किमान १५ ते १६ जागा सोडाव्या लागतील. त्यामुळेच काँग्रेस युतीची बोलणी करण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीत शेवटच्या क्षणी गोवा फॉरवर्डला तीन जागा दिल्या गेल्या. मात्र, त्यातील एकच जागा जिंकण्यात यश आले होते.

२०२२ मधील काँग्रेसचे फुटीर आमदार

२०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मायकल लोबो (कळंगूट), दिलायला लोबो (शिवोली), रुडॉल्फ फर्नांडिस (सांताक्रूझ), राजेश फळदेसाई (कुंभारजुवे), केदार नाईक (साळगाव), दिगंबर कामत (मडगाव), आलेक्स सिक्वेरा (नुवे) व संकल्प आमोणकर (मुरगाव) हे आमदार फुटले. हे सर्व आमदार आता भाजपमध्ये आहेत.

११ आमदार निवडून येऊनही पक्ष फुटला

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ११ आमदार निवडून आले होते. मात्र त्यातील ८ आमदारांनी निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे केवळ तीनच आमदार काँग्रेसमध्ये राहिले आहेत. यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव (बाणावली), एल्टन डिकॉस्टा (केपे) व कार्लुस फेरेरा (हळदोणा) यांचा समावेश आहे.

goa congress
Goa: बाणावली मतदारसंघात पुन्हा काँग्रेस-आप लढत?

फुटीरांना प्रवेश नाही

काँग्रेस पक्षातून २०१९ मध्ये १५ पैकी १० आमदार फुटले. २०२२ च्या निवडणुकीनंतर ११ पैकी ८ आमदार फुटले. गिरीश चोडणकर यांनी जाहीर केले आहे की फुटीरांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही की उमेदवारी नाही. त्यामुळे काँग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

जि.पं. मध्ये दक्षिणेत यश

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या जि. पं. निवडणुकीत उत्तरेत हळदोणा व शिरसई या दोन जागा काँग्रेसने जिंकल्या. तर दक्षिणेत २० पैकी ८ जागा जिंकल्या. यावरून दक्षिणेत काँग्रेस मजबूत असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news