

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेला अद्याप कोणताही ठोस आकार मिळालेला नाही. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या गोवा दौऱ्यात या विषयावर महत्त्वाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दौरा संपल्यानंतरही कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने विलीनीकरणाची प्रक्रिया सध्या रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.
दक्षिण गोव्यात भाजपसाठी राजकीय आव्हान ठरू शकणाऱ्या गोवा फॉरवर्डच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोडाचे आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत काँग्रेस नेतृत्वासमोर प्रस्ताव मांडला होता. मात्र, काँग्रेसच्या केंद्रीय किंवा प्रदेश नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत चर्चेची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावर झालेल्या बदलानंतर पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. अमित पाटकर यांच्या जागी गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर विविध गटांतील मतभेद उघडपणे समोर आले. गोवा काँग्रेस नावाच्या नव्या पक्षाच्या नोंदणीसंदर्भात अर्ज दाखल झाल्याने संघटनात्मक पातळीवरही गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर के. सी. वेणुगोपाल यांनी गोव्यात वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी स्वतंत्र चर्चा केली. या बैठकीत संघटनात्मक बदलांसह गोवा फॉरवर्डच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावावरही चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बैठकीनंतर या विषयावर कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही. या संदर्भात विजय सरदेसाई यांनी सांगितले की, 'प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ५ जुलै रोजी चर्चा करू, असा संदेश पाठविला होता. मात्र, अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे पुढील भूमिका काय असेल, हे सध्या सांगता येणार नाही.'
चर्चा किमान १५ दिवस पुढे जाणार...
सरदेसाई रविवारी लंडनला रवाना होत असून ते सुमारे पंधरा दिवस तेथे राहणार आहेत. गोमंतकीयांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्याबरोबरच काही वैयक्तिक कार्यक्रमांसाठीही त्यांचा हा दौरा आहे. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमधील विलीनीकरणाबाबतची पुढील चर्चा किमान पंधरा दिवस पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी मतांचे एकत्रीकरण करण्याच्या प्रयत्नांना तात्पुरता विलंब होण्याची चिन्हे असून, काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व कोणती भूमिका घेते आणि गोवा फॉरवर्ड पुढे काय निर्णय घेते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.