

साखळी : पुढारी वृत्तसेवा
मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाच्या आजारांचे प्रमाण गोव्यात वाढत आहे. पूर्वी केवळ बांबोळी येथील गोमेकॉ इस्पित्तात डायलिसिसची सुविधा होती. मात्र, आता प्रत्येक तालुक्यात मूत्रपिंडाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास वाड्यावाड्यांतून दोन घरामागे एक डायलिसिस यु닛 उभारण्याची वेळ येईल, अशी भीती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची नियमित तपासणी करून वेळे치 उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
साखळी येथील फिजियोथेरपी व निसर्गोपचार महाविद्यालयात गोमेकॉ इस्पितळ आणि मातोश्री पद्मिनी शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग पूर्वतपासणी, दंत तपासणी आणि स्त्रीरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी मातोश्री पद्मिनी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, व्यवस्थापक संतोष मळीक, कर्करोग तपासणी अभियानाचे अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर, डॉ. अमिता केकरे कामत, डॉ. अतुल पै वीर आणि डॉ. रेशमा तारी उपस्थित होते.
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास किरकोळ त्रासाचेही भविष्यात गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते, असेही ते म्हणाले.