

Goa Education News
पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (दि.२४) सकाळी १०.३० च्या सुमारास माशेल येथील पंतप्रधान रायझिंग स्कूल अंतर्गत निवड झालेल्या सरकारी प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मध्यान्ह आहाराचा आस्वाद घेतला. त्यानंतर शाळेच्या विविध बाबींची सविस्तर माहिती घेतली.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शाळेतील एकंदर प्रगती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षकांची संख्या, तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेचीही चौकशी केली.राज्यातील शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा उंचाविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी शिक्षक व पालक शिक्षक संघ सदस्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या. शाळेतील मुलांशीही त्यांनी संवाद साधत त्यांच्या शिक्षणातील अनुभव जाणून घेतले.
मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीमुळे शाळा परिसरात क्षणभर गोंधळाचे वातावरण होते. मात्र, त्यांच्याकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि सुचवलेले उपाय शाळा प्रशासनाला लाभदायक ठरणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.