

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
आमोणा येथे मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह साखळीच्या दिशेने जात असताना एका जीपने ताफ्याला धडक देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एका पोलिस कॉन्स्टेबलसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ताफा आमोणा-साखळी जंक्शन येथे आला असताना ही जीप ताफ्याच्या दिशेने येत होती. ताफ्यातील सुरक्षा पथकाने संशयास्पद हालचाल लक्षात येताच तातडीने हस्तक्षेप करून संबंधित वाहन थांबवले.
वाहनाने ताफ्याला धडक देण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून गाडीतील पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनासह पाचजणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये एक पोलिस कॉन्स्टेबल आहे. संबंधित सर्वजण खांडोळा-बेतकी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेवेळी मुख्यमंत्री ताफ्यात उपस्थित होते. वाहनाचा चालक मद्याच्या प्रभावाखाली असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.