

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत 'सेवा संकल्प अभियान' राबवले जात आहे. या अंतर्गत 'सरकार तुमच्या दारी' या संकल्पनेतून आम्ही थेट लोकांपर्यंत पोहोचत आहोत. साखळीनंतर बारदेश तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम यशस्वी झाला आहे.
प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारात पोहोचवून शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
देशभरात आयोजित केलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत 'सेवा सेतुसंगम' या उपक्रमाखाली म्हापसा येथे झालेल्या 'सरकार तुमच्या दारी' या उपक्रमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सावंत पत्रकारांशी बोलत होते. बारदेश तालुक्यातील सातही मतदारसंघांतील नागरिकांनी आपल्या विविध समस्या मुख्यमंत्र्यांकडे प्रत्यक्ष मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्या समस्यांची सोडवणूक करण्याची सूचना दिली.
कार्यक्रमाला म्हापशाचे आमदार तथा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसोझा, मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर, गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला अनेक जणांनी आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून त्या सोडवण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपजिल्हाधिकारी, मामलेदार, वीज खाते, पाणीपुरवठा खाते, नगर नियोजन खाते, पोलिस खाते, सहकार निबंधक, नागरी निबंधक या खात्याच्या अधिकाऱ्यांना समस्यांचे निराकरण करण्याची सूचना दिली.
नागरिकांशी थेट संवाद:
पाणी आणि वीज बिल, रस्ते, गटारे, नगरपालिकेची कामे, बाजारपेठेतील प्रलंबित प्रश्न, उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयाशी संबंधित विषय तसेच 'माझे घर' योजनेतील म्युटेशन व प्रशासकीय कामकाजासंबंधीच्या अडचणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांकडून 'वन-टू-वन' जाणून घेतल्या.
बारदेश तालुक्यातील विविध पंचायतींचे पंच सदस्य, सामाजिक संघटना आणि एनजीओच्या प्रतिनिधींनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विकासकामांबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सरकारी खात्यांच्या प्रमुखांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. लोकांच्या अर्जांवर त्वरित कारवाई करून त्यांच्या समस्या जागेवरच निकाली काढण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.