

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यासाठी डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः पुढाकार घेत उच्चस्तरीय बैठक घेतली असून सर्व संबंधित खात्यांना हाय अलर्ट मोडवर राहण्याचे कडक आदेश दिले आहेत. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना, पूरस्थिती किवा आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी ठेवावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी डिचोलीत दिली.
उच्च स्तरीय बैठकीत प्रत्येक तालुका, पंचायत, नगरपालिका तसेच विविध सरकारी खात्यांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत मिळावी, यासाठी सर्व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सतत सतर्क राहण्यास सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश. प्रत्येक तालुक्यात आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू ठेवावेत. पूरप्रवण भागांमध्ये नदी, नाले आणि गटारे तातडीने स्वच्छ करावीत. धोकादायक झाडांच्या फांद्या हटवून दुर्घटना टाळाव्यात. असिशामक दलाला अतिरिक्त वाहने, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. आरोग्य, वीज, पाणीपुरवठा, वाहतूक आणि जलसंपदा विभागांनी समन्वयाने कार्य करावे.
आपत्ती घडल्यानंतर १० मिनिटांच्या आत प्रतिसाद देण्याची यंत्रणा सक्षम करावी. तसेच तालुका पांच्यात पातळीवर आर्थिक तरतूदही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत मान्सूनपूर्व उपाययोजनांमुळे पुरस्थितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
विशेषतः गाळ उपसणे, नाले साफ करणे, कचरा हटवणे आणि जलनिस्सारण व्यवस्था सुधारल्यामुळे अनेक भागांतील धोका कमी झाला आहे. सुपाची पूड - साखळी येथे गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभकरण्यात आला. यावेळी नगरसेवक यशवंत माडकर, जलसंपदा अधिकारी विनोद भंडारी, दिनेश कामत, वासुदेव गावस तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
डिचोली व साखळी परिसरात विशेष मोहीम
डिचोली तालुक्यातील साखळी, नानोडा, भटवाडी, चाळ, सुपाची पूड आणि साखळी बाजारपेठ या पूरप्रवण भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ उपसण्याची आणि नाले साफ करण्याची कामे सुरू आहेत, जलसंपदा विभागाने विविध ठिकाणी विशेष मोहीम हाती घेतली असून आवश्यक दुरुस्तीची कामेही वेगाने सुरू आहेत
आमदारांकडूनही प्रशासनाला सूचना
स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मतदारसंघातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे प्रेमेंद्र शेट यांनीही मये मतदारसंघात गटारे, नाले आणि पूरप्रवण भागांतील गाळ उपसण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.