

पणजी (पुढारी वृत्तसेवा): मी कोणताही पक्ष फोडला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आणि नेतृत्व पाहून आमदार स्वतः भाजपमध्ये दाखल झाले. विरोधी पक्षात नेतृत्वाचा अभाव हेही एक कारण असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत केले आहे. येणारी निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली लढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करून त्यांनी ४० पैकी २० जागा जिंकून पुन्हा सत्ता आणली होती. गेल्या पाच वर्षांत मी गोव्याला चांगले प्रशासन देण्याबरोबरच तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण केल्या, गोवा सरकारी कर्मचारी भरती आयोग स्थापन करून सरकारी नोकरीसाठी भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपातील हवा काढून घेतली.
पंतप्रधानांच्या फ्लॅगशिप उपक्रम ९० टक्क्यांपर्यंत यशस्वीरीत्या राबवून यशस्वी केले, असेही ते म्हणाले. आपल्या काळात एवढा विकास झाला आहे, आता करण्यासारखे फार कमी शिलक आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या सात वर्षांत स्थिर सरकार देतानाच 'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमाद्वारे विकास तळागाळापर्यंत पोहोचवला आहे.
गेल्या सात वर्षांत काँग्रेसचे १८ आमदार भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्या या राजनैतिक कौशल्यावर भाजपचे वरिष्ठ नेते खुश असून, डबल इंजन सरकारने गोव्याचा भरीव विकास केला आहे. पुन्हा एकदा डॉ. सावंत यांच्याच नेतृत्वाखाली भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री विश्वजित राणे यांनीही काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, भाजपच जिել असे सांगून त्यानंतरच्या सरकारचे नेतृत्वही डॉ. सावंत करतील, असे विधान केले होते. त्यामुळे सावंत यांचा दबदबा वाढल्याचे बोलले जाते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 'विकसित गोवा २०३७' वर बोलताना म्हणाले की, गोवा शंभर टक्के साक्षर राज्य आहे. येथे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. आम्ही मोठ्या आणि लहान राज्यापेक्षा एक पाऊल पुढे आहोत. सरकारने कायदेशीर आणि शाश्वत खाणकाम सुरू केले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.