पणजी - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सीएए कायद्याच्या अंमलबजावणीनंतर गोव्यातील पहिले लाभार्थी म्हणून कासावलीतील जोसेफ फ्रान्सिस परेरा यांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी परेरा यांची पत्नी मार्था परेरा उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यासह परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळण्यापूर्वी १९६० च्या दरम्यान परेरा आपल्या नातेवाईकांकडे पाकिस्तानमधील कराचीला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण पाकिस्तानात झाले आणि त्यानंतर ते कामानिमित्ताने मध्य आशियातील बहरीनला स्थलांतरित झाले.
यादरम्यान त्यांचा गोव्यातील मार्था परेरा यांच्याशी विवाह झाला आणि निवृत्तीनंतर ते दक्षिण गोव्यातील कासावली येथे स्थायिक झाले. मात्र त्यांच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्व असून गेली अनेक वर्ष ते भारतीय नागरिकत्वासाठी प्रयत्नशील होते. सीएए कायदा आल्यानंतर त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना भारतीय नागरिकत्व मंजूर केले आणि आज ते मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते प्रदान केले.