पणजी : पुढारी वृत्तसेवा
सध्या राज्यात सुमारे ३,५०० वारकरी नोंदणीकृत असले, तरी प्रत्यक्षात दरवर्षी ५ हजारांहून अधिक गोमंतकीय वारकरी पायी दिंडीसोबत पंढरपूरची वारी करतात. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपुरात २,००० चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली असून, पुढील आषाढी वारीपूर्वी तेथे गोमंतकीय वारकऱ्यांसाठी प्रशस्त 'विठ्ठल-रखुमाई भवन' उभारण्याचा राज्य सरकारचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. त्यासाठी भूखंड संपादन प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अयोध्येत ४,००० चौरस मीटर जमीन खरेदी करण्यात आली असून, तेथेही गोमंतकीयांसाठी 'राम निवास' उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी वारकरी दिंडी योजनेच्या अनुदान वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कला आणि संस्कृतीमंत्री रमेश तवडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, खासदार सदानंद शेट तानावडे, कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर, खात्याचे संचालक विवेक नाईक उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पंढरपूर येथील भवनाचे नाव विठ्ठल-रखुमाई अथवा गोवा पंढरपूर भवन असे ठेवण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय येथील वारकरी पथकांनी घ्यायचा आहे. भवनासाठी २ हजार चौरस मीटर जागा शोधण्यात आली आहे. भूखंड ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया या वारीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षीच्या वारीपूर्वी या भवनाचे उद्घाटन होईल. या भवनाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मला पुन्हा एकदा संधी मिळेल, असे मागणे मी देवाकडे करणार आहे. ते म्हणाले, योजनेअंतर्गत चाळीसहून अधिक वारकरी असणाऱ्या पथकांना १ ते ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. यंदा राज्यभरातील ३६ पथकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ३५०० हून अधिक वारकऱ्यांचा समावेश आहे. अर्थसहाय्य दोन दिवसांत पथकांच्या बँक खात्यात जमा होईल.
पुढील वर्षी अयोध्या तीर्थयात्रा योजना सुरू करणार
पुढील वर्षात अयोध्या तीर्थयात्रा योजना सुरू करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. साठ वर्षांच्या वरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. अयोध्या येथील गोवा राम निवासासाठी भूखंड ताब्यात घेतला आहे. येथे नाममात्र शुल्क देऊन राहण्याची सोय होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
२००९ पासून गोमंतकीयांची वारी
वारकरी संप्रदाय हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून २००९ पासून गोमंतकीय वारकरी देखील पायी दिंडी वारी करत आहेत. यानंतर आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील ही परंपरा अशीच अबाधित ठेवण्यासाठी सर्व वारकऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री रमेश तवडकर यांनी केले.