

पणजी : राज्यभरातून सुमारे 5 हजार वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला वारीतून जातात. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, असा खासगी ठराव आ. प्रेमेंद्र शेट यांनी शुक्रवारी सभागृहात मांडला होता. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे येत्या वारीपासून वारकर्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिली. राज्यभरातून आषाढी कार्तिकी एकादशीला विठ्ठल दर्शनासाठी जाणार्या पंढरपूर यात्रेला (वारी) आवश्यक ती मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीर केले.
विठ्ठलाची वारी हा सांस्कृतिक ठेवा आहे. तो भक्ती आणि उपासनेचा मार्ग असून राज्यातून त्याला चांगला पाठिंबा मिळणे हा चांगला पायंडा आहे. समाज कल्याण किंवा कला आणि संस्कृती खात्यातर्फे विशेष योजना तयार केली जाईल. किंवा मुख्यमंत्री देवदर्शन योजनेचा आधार घेतला जाईल. यासाठी वारीच्या अगोदर दोन महिने नावनोंदणी करावी आणि वारीतून परत आल्यानंतर त्याची माहिती द्यावी. यासाठी सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल. या खासगी प्रस्तावाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह अनेक आमदारांनी उस्फूर्त पाठिंबा दिला. त्यामुळे हा खासगी ठराव एकमताने सभागृहात मंजूर करण्यात आला.