

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) आधुनिकीकरण आणि दर्जावाढ करण्यासाठी सरकारकडून २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. तसेच गोव्यातील दुसरे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
नव्या झुआरी पुलावर रविवारी सकाळी मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी त्याचे उद्घाटन केले. गोवा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या मॅरेथॉनला ५,५०० हून अधिक युवकांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि प्रदेश प्रमुख तुषार केळकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. त्यावेळी या कार्यक्रमात ते बोलत होते.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी ५, १० आणि २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) अशा तीन श्रेणी ठेवण्यात आल्या होत्या. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धक पहाटे ५ वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. यामध्ये तरुणांपासून ते मध्यम वयाच्या नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
'फिट इंडिया' आणि 'माय भारत' या उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन गोव्याला निरोगी आणि तंदुरुस्त राज्य बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. मॅरेथॉनला मिळालेला मोठा प्रतिसाद लक्षात घेता अशी स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. युवकांनी 'फिट इंडिया' मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि व्यसनमुक्त गोवा घडवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
केवळ स्पर्धात्मक खेळांपुरती क्रीडा चळवळ मर्यादित न राहता ती युवकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होणे आवश्यक आहे. अशा उपक्रमातून राज्यातील नवोदित खेळाडूंना त्यांची क्षमता दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन, तसेच स्थानिक युवकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे.
१३ डिसेंबरपर्यंत 'मुख्यमंत्री चषक २.०' स्पर्धा
'मुख्यमंत्री चषक २.०' हा उपक्रम १३ डिसेंबरपर्यंत राज्यभर सुरू राहणार आहे. या कालावधीत १४ तालुक्यांतील विविध ठिकाणी, तसेच तीन 'खेलो इंडिया' केंद्रांवर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन आणि कॅरम या पाच खेळांचा समावेश आहे.
त्याचबरोबर फुगडी, घुमट आरती, पथनाट्य, एकल गायन, रांगोळी आणि चित्रकला अशा सांस्कृतिक स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात एक लाखांहून अधिक युवकांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मतदारसंघ पातळीवरील स्पर्धा १ ते १० डिसेंबरदरम्यान होतील, तर १० ते १३ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय फेऱ्या घेण्यात येणार आहेत. १३ डिसेंबर रोजी या उपक्रमाचा समारोप होणार आहे.