

पणजी : चिंबल परीसरात बेकायदेशीर बोअरवेल खोदल्याच्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी केलेल्या जागेच्या तपासणीत चिंबल येथील धारवाडकर कॉलनीमध्ये अशा 70 हून अधिक बेकायदेशीर बोअरवेलचा शोध लागला. जलसंपदा खाते (डब्ल्यूआरडी) चे अधिकारी तक्रारदारांना सोबत पाहणी करण्यासाठी गेले असता थोडक्या भागात बोअरवेलची संख्या पाहून आश्चर्यचकित झाले.
या "कॉलनीतील अनेक घरांमध्ये नळाच्या पाण्याचे कनेक्शन नसल्यामुळे बोअरवेल घरगुती वापरासाठी खोदण्यात आल्या होत्या." वसाहतीमध्ये बोअरवेल खोदताना परवाना घेतला गेला नसल्याचे लक्षात आल्यानंतर अना ग्रेशियास या स्थानिक कार्यकर्त्याने भूजल अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली.
येथे व्यावसायिक पुरवठ्यासाठी दोन पाण्याचे टँकर भरणाऱ्या व्यक्तींनाही अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. अवैध बोअरवेलच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. "भूजल अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय बोअरवेल खोदणे आणि पाण्याची वाहतूक करणे हे गोवा ग्राउंड वॉटर ॲक्ट 2002 आणि नियम 2003 चे उल्लंघन आहे," असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
बोअरवेल खोदणाऱ्या घरांच्या मालकांची माहिती न दिल्याबद्दल चिंबल पंचायतीच्या सचिवांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. या बोअरवेलचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश वीज विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना देण्यात आले आहेत.
परवानगी शिवाय बोअरवेल खोदून नियमभंग केलेल्या सर्व बोअरवेल मालकावर कडक कारवाई केली जाईल. अशी माहिती जलसंपदा खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.