

पणजी (पुढारी वृत्तसेवा):
बालदिन आणि जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुलांमध्ये टाईप २ मधुमेहाचा वाढता धोका असल्याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. विशेषतः १० ते १२ वयोगटातील मुलांमध्ये पौंगंडावस्थेच्या काळात मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जागरूकतेचा अभाव आणि उशिरा निदान यामुळे मुलांना लहान वयातच गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असा गंभीर इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा अमोुलकर यांनी बैठी जीवनशैली आणि अयोग्य आहार ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले. मधुमेह टाळण्यासाठी मुलांनी दररोज ४५ ते ६० मिनिटे शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. टीव्ही आणि मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन द्यावे.
तसेच संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन याकडेही पालकांनी लक्ष द्यावे, असे त्यांनी सुचवले. सतत थकवा जाणवणे तसेच मान आणि काखेत गडद, मखमली त्वचेचे चट्टे दिसणे ही मधुमेहाची संभाव्य लक्षणे आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात न राहिल्यास डोळ्यांचा पडदा, मूत्रपिंड, हृदय आणि मज्जातंतूंना कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. आदित्य फडते यांच्या मते, लहान वयात होणारा टाईप २ मधुमेह प्रौढांपेक्षा वेगाने वाढतो. त्यामुळे मूत्रपिंडाचे आजार, दृष्टीदोष, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. बालरोगतज्ज्ञ डॉ. नथानिएल जॉन पिंटो यांनी स्क्रीनसमोर अधिक वेळ घालवणाऱ्या मुलांना हा धोका अधिक असल्याचे सांगत,
कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असलेल्या किंवा मातेला गर्भावस्था असताना मधुमेह असलेल्या मुलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. लठ्ठपणा किंवा एकापेक्षा अधिक धोक्याचे घटक असलेल्या मुलांची नियमित तपासणी करणे गरजेचे असून, त्यांनी आठवड्यातून किमान पाच दिवस ४५ मिनिटे ते एक तास शारीरिक हालचाल करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.