पणजी : गोव्यात चवथीच्या सणाला नवीनच लग्न झालेल्या मुलीच्या घरून जावयाच्या घरी 'वजे' पाठवण्याची परंपरा आहे. सध्या पणजीतील बाजारपेठांमध्ये वज्यासाठी करंज्या, लाडू आणि विविध प्रकारची मिठाई घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
राजधानीत कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्य गटांतर्फे ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत. सध्या राजधानीत वज्यासाठी म्हणून असलेल्या करंज्या २० ते ३० रुपयांना विक्रीस उपलब्ध आहेत. करंजीचे १ पाकीट १०० रुपयांना उपलब्ध आहे.
करंज्यांसोबतच लाडू, बर्फी, फळफळावळ इत्यादी गोड पदार्थही वज्यामध्ये दिले जातात, यामध्ये बेसनाचे लाडू ७० रुपये, बेसन बर्फी ९० रुपये तर चणाडाळ, मूगडाळ, तिळ, पिठी आणि सुख्या खोबऱ्यापासून बनलेल्या करंज्या १२० रुपयांना प्रति पाकीट विकल्या जात आहेत. गणेशोत्सव जवळ आला की आधीच्या काही दिवसात वाड्यावाड्यांवर घराघरातून गोड पदार्थांचा घमघमाट सुरू होतो.
बाप्पाच्या आगमनासाठी मोदकांसोबतच मुलीच्या सासरी जाणाऱ्या वज्यासाठी नेवऱ्या, लाडू, पातोळ्या, गूळपोहे असे विविध पदार्थ बनवले जातात. यावेळी शेजारील महिला मदतीसाठी येऊन मिळूनमिसळून या सर्व प्रथा पूर्ण केल्या जातात,
लाकडी पाट ४ ते ६ हजारांच्या घरात...
मुलीच्या माहेरहून पाठवण्यात येणाऱ्या वज्याच्या गोड पदार्थांची किंमत मागील वर्षाच्या तुलनेत वाढली आहे. यासोबतच माटोळीला लागणारे लाकडी सामानही मुलीच्या घरून पाठवले जाते. यामध्ये दिले जाणारे मोठे लाकडी पाट ६००० रुपयांना जोडी, तर मध्यम आकाराचे ४००० रुपयांना जोडी उपलब्ध आहे. या किमती सामान्यांना परवडणाऱ्या नसल्याचे अनेकांनी सांगितले.
जिन्नस महागल्याने किमती वाढल्या
प्रामुख्याने चतुर्थीत बनवल्या जाणाऱ्या करंज्यांसाठी लागणारे साखर, खोबरे, चणाडाळ, मूगडाळ, तीळ, पिठी, रवा आदींचे दर वाढले आहेत. विशेषतः चतुर्थीच्या काळात महागाई वाढते. त्यामुळे पर्यायाने हे पदार्थ जेव्हा विक्रीसाठी आणले जातात तेव्हा त्यांचीही किंमत वाढते, अशी माहिती विक्रेत्या सुलक्षा गुडेकर यांनी दिली.
गोव्यातील अनोखी प्रथा
गोव्यातील गणेश चतुर्थीचा सण सगळ्यात मोठा असून तो अतिशय थाटात साजरा केला जातो. यातच वजे पाठवण्याची प्रथा गोव्यात आहे. गोव्यात चवथ ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळीवेगळी असून भरभरून करंज्या, लाडू, फळफळावळ इत्यादी सोबत माटोळीला लागणारे लाकडी सामानही वज्यातून पाठवले जाते. एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर घरातल्या गणपतीला सांगणे करण्यात येते. जर बाप्पाच्या कृपेने दाम्पत्याला त्याच वर्षी बाळ झाले त्यावर्षीच्या चवथीत बाळाला कपड्यात गुंडाळून काही क्षण माटोळीला बांधून ठेवण्याचीही परंपरा आहे.