

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौरावाडा-कळंगुट परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीत चार रॉक्स जळून खाक झाले. या आगीमुळे रॉक्सचे कोट्यवधी नुकसान झाले आहे. आगीच्या घटनास्थळापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अग्निशमन दलाचे वाहन पोहोचू शकले नाही.
रॉक मालकांनी पाणी व रेतीच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ते व्यर्थ ठरले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट येथील रॉक्सना अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि एका रांगेत असलेले चार रॉक्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रॉकमध्ये असलेले सामान वाचवण्यासाठी रॉक मालकांनी व कर्मचाऱ्यांनी बादलीने पाणी, तसेच रेती मारून ती विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने हे प्रयत्न तोकडे पडले. ही दुर्घटना भरदिवसा घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली; मात्र आगीच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी वाळू असल्याने पाण्याच्या बंबाने पाणी फवारणी करून ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या रॉकच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रॉक मालकांनी व्यवसायासाठी अग्निशमन दलाची परवानगी घेताना त्यात नमूद केलेल्या अटींची पूर्तता केली होती का याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, नुकसानीचा अधिकृत तपशीलही समोर आलेला नाही. या घटनास्थळी स्थानिक आमदार मायकल लोबो तसेच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी भेट देऊन झालेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली.
उदरनिर्वाहावर संकट
कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक रॉक व्यवसाय आहेत. या दुर्घटनेत चार रॉक खाक झाल्याने प्रत्येकी सुमारे ३०-३५ लाखांचे नुकसानीचा दावा मालकांनी केला आहे. हे व्यावसायिक पारंपरिक मच्छीमार समाजातील असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असतो; मात्र झालेल्या दुर्घटनेमुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे.