

पणजी : कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा अद्यापही सुरूच आहेत. मात्र या फेरबदलाविषयीचा ‘सस्पेन्स’ कायम असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत मौन बाळगले असून, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक गुरुवारपासून दिल्लीत आहेत. रविवारपर्यंत दिल्लीत ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची विविध विषयांवर चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी गावडे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सप्टेंबर 2022 पासून मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी चर्चा सुरूच आहेत. मात्र गेल्या अडीच वर्षात मंत्रिमंडळात कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. यासाठी इच्छुक आमदार गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या परीने ठिकठिकाणी लॉबिंग करत आहेत. आता मंत्री गावडे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात येईल, त्याबरोबरच मंत्रिमंडळातील मोठा फेरबदल होईल अशा चर्चा आहेत. अर्थात, मंत्री गावडे यांना युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) या संघटनेने आपले समर्थन कायम राखत मंत्री गावडे स्वतःच्या व्यासपीठावर समाज हितासाठी जे बोलले आहेत त्यात गैर काय आहे? असे उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी आज पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
फर्मागुढी येथे आज उटा संघटनेच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केले आहे. या मेळाव्याला लोक मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते. याशिवाय उटा संघटनेचे विश्वास गावडे, युगांक नाईक यांनी मंत्री गावडे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान बहुजन महासंघानेही मंत्री गावडे यांना पाठिंबा दर्शवला असून गावडे समाजासाठी वावरत असून त्यांचा उद्देश कोणावर टीका करायचा नसून समाजातील खालच्या तळातील व्यक्तींची कामे झाली पाहिजेत, ही त्यांची तळमळ आहे असेही या नेत्यांनी म्हटले आहे.