

पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला मंत्रिमंडळातील फेरबदल अखेर या महिन्याच्या अखेर होईल. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर 20 डिसेंबरनंतर हा फेरबदल होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात तीन नव्या मंत्र्यांना घेण्यात येईल, तर तितक्याच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येईल, अशी माहिती आहे. उपमुख्यमंत्री पदासंदर्भातही दिल्लीत चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड मिळालेल्या यशानंतर लगेचच राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. राज्याला फेरबदलाच्या चर्चा नवीन नाहीत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधील 8 आमदारांचा गट भाजपमध्ये दाखल झाला. या आमदारांना मंत्रिपदे आणि इतर पदे मिळणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. याला दोन वर्षे झाली, तरीही अद्याप आलेक्स सिक्वेरा वगळता कोणालाही मंत्रिपद मिळालेले नाही.
मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आमदार मायकल लोबो, संकल्प अमोणकर यांची नावे आघाडीवर आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी चांगली कामगिरी केलेल्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जावे, अशी पक्षातील एका गटाची मागणी आहे. त्यावर भाजप सुकाणू समिती, पक्षश्रेष्ठी यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. याबाबत गोवा प्रभारी आशिष सूद यांनी आपला निरीक्षण अहवाल केंद्रीय नेत्यांकडे दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत, भाजप सुकाणू समिती यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल. मंत्रिमंडळात फेरबदल करताना जितक्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्यात येईल, तितक्याच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागेल. कारण मंत्रिमंडळाची बारा ही मर्यादा निश्चित आहे. मंत्रिमंडळात नव्याने दोन किंवा तीन आमदारांना घेण्यात येईल, तितक्याच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येईल. यासाठी दिल्लीत वेगवेगळ्या नेत्यांचे लॉबिंग सुरू आहे.